Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रेषीत मोहंमद यांचा अपमान : नुपूर शर्मा भाजपमधून निलंबीत

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | प्रेषीत हजरात मोहंमद यांच्याबाबत अपमानकारक टिपण्णी केल्याप्रकरणी भाजपने आपल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबीत केले असून नवीन जिंदल यांच्यावरही कारवाई केली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. शर्मा यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातील कानपूर याठिकाणी दंगल देखील उसळली होती.

त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित केलं असून त्यांना सर्व जबाबदार्‍यातून मुक्त केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह म्हणाले की, भाजपा कोणत्याही धर्मातील धर्मगुरुंचा अनादर करत नाही. कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या भावना दुखावणारा विचार आम्हाला मान्य नाही.

अरुण सिंह यांनी याबाबत आज जारी केलेल्या पत्रात म्हटलं की, भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्माची भरभराट झाली आहे. भारतीय जनता पार्टी सर्व धर्मांचा आदर करते. भाजपा कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचा अपमान करत नाही. कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अपमान करणार्‍या विचारधारेच्या विरोधात पक्ष ठाम आहे. भाजपा अशा कोणत्याही विचारधारेचा प्रचार करत नाही. दरम्यान, भाजपचे मीडिया प्रभारी नवीन कुमार जिंदाल यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. नवीन कुमार जिंदाल यांनी या मुद्द्यावर काही वादग्रस्त ट्विट केले होते. यामुळे त्यांना देखील बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

Exit mobile version