Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरेच्चा…आता रोबो करणार पुण्यातील वाहतुकीचे नियंत्रण !

पुणे प्रतिनिधी । पुणे तिथे काय उणे असे नेहमी म्हटले जाते. याचीच प्रचिती देणारी घटना आता घडणार असून या शहरातील वाहतुकीचे नियंत्रण चक्क रोबो ट्रॅफीक पोलीस करणार आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांची निर्मिती

पुण्यातील सहा शाळकरी विद्यार्थ्यांनी रोडेव या नावाचा नवीन रोबो अर्थात यंत्रमानव तयार केलेला आहे. याची खासियत म्हणजे हा रोबो वाहतुकीचे नियंत्रण करण्यास सक्षम आहे. यामुळे आता हा रोबो १५ जानेवारी म्हणजेच आजपासून प्रत्यक्षात कामकाजास सुरूवात करत आहे. पुणे वाहतूक विभागाच्या उपायुक्त तेजस्वीनी सातपुते यांच्या पुढाकाराने हा रोबो कार्यरत होणार आहे. विशेष बाब म्हणजे संपूर्ण देशात पहिल्यांदाच असा प्रयोग होत आहे.

दोन महिन्यांचे परिश्रम

रोडेव हा यंत्रमानव पुणे येथील एसपी रोबोटिक्स मेकर लॅबच्या सहा शाळकरी विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहे. आदी कांचेकर, पार्थ कुळकर्णी, रचीत जैन, शौर्य सिंग, श्रुतेन पांडे आणि विनायक कृष्णा या विद्यार्थ्यांनी याला विकसित केले आहे. हे सर्व सातवी आणि आठवीतील शाळकरी विद्यार्थी आहेत. एसपी रोबोटिक्स मेकर लॅबचे संचालक संदीप गौतम यांनी पुणे मिररला दिलेल्या मुलाखतीत या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले की, दोन महिन्यांच्या प्रयत्नातून हा रोबो तयार करण्यात आलेला आहे. यासाठी संबंधीत विद्यार्थ्यांना चेन्नई येथील तंत्रज्ञांची मदत मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

… तर व्याप्ती वाढणार

रोडेव या यंत्रमानवामध्ये १६ इंच आकारमानाचा एलईडी डिस्प्ले दिलेला आहे. यावर नागरिकांना वाहतुकीच्या नियमांबाबतची माहिती डिस्प्ले करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तर या रोबोचे बाहू त्यात फिड केल्यानुसार वाहतुकीसाठी आवश्यक असणारे हातवारे करण्यास सक्षम आहे. यामुळे एकाच वेळी जनजागृतीसह वाहतुकीचे नियंत्रण करण्याचे कामदेखील हा रोबो करणार आहे. पहिल्यांदा हा रोबो प्रायोगिक तत्वावर कार्यरत करण्यात आलेला आहे. याला उत्तम यश लाभल्यास याची व्याप्ती वाढविण्यात येईल अशी शक्यता आहे.

Exit mobile version