Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता तरूणाच्या आत्महत्या प्रकरणामुळे मंत्री शंकरराव गडाख अडचणीत

मुंबई प्रतिनिधी | राज्य सरकारमधील विविध मंत्री वादाच्या भोवर्‍यात सापडत असतांना आता मंत्री शंकरराव गडाख यांचा कथित पीए म्हणवणार्‍या तरूणाने आत्महत्या केली असून यापूर्वी तयार केलेल्या व्हिडीओत त्यांचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गडाख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उपाध्ये म्हणाले की, मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे कर्मचारी असलेल्या एका तरुणाने मंत्री गडाख यांच नाव घेत आत्महत्या केली आहे. प्रतीक बाळासाहेब काळे असे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ बनवला होता. त्यामध्ये त्याने आपण मंत्र्यांकडे पीए असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच मी तुमच्याकडे सहा वर्षे काम केले, माझी बदनामी का करता असा प्रश्नही विचारला होता. या प्रकरणात त्या तरुणाने तयार केलेल्या व्हिडीओमध्ये साधारण दहा जणांची नावे त्याने घेतली आहेत. मात्र पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. दहा जणांची नावं घेतल्यानंतरही केवळी सात जणांवरच गुन्हा दाखल झाला आहे, पण तीन नावांबद्दल पोलिसांनी अळी मिळी गुप चिळी साधली आहे, असा दावा उपाध्येंनी केला आहे.

केशव उपाध्ये पुढे म्हणाले की, अशा प्रकारे राज्य सरकारमध्ये जलसंधारणासारखं महत्त्वाचं खातं सांभाळणार्‍या शंकरराव गडाख यांचं नाव घेऊन कुणी आत्महत्या करत असेल आणि त्याची चौकशी होणार नसेल तर ती शोकांतिका आहे. महाराष्ट्रामध्ये आता लोक मंत्र्यांचं नाव घेऊन आत्महत्या करायला लागले आहेत. याआधी एका मंत्र्याशी संबंधित तरुणीने आत्महत्या केली होती. आता एका मंत्र्याच्या पीएने आत्महत्या केली आहे. ३० तारखेला ही घटना घडली. या घटनेनंतर नगर जिल्ह्यामध्ये असंतोषाचं वातावरण आहे. वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचे बोलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

शंकरराव गडाख यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. तसेच ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी सरकारने त्यांना बाजूला केले पाहिजे. ते मंत्रिपदावर असताना पोलीस कारवाई करायला धजत नाहीत, असे चित्र आहे, असे ते म्हणाले. तसेच जर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यास टाळाटाळ केली तर भाजपा या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करेल, असेही उपाध्ये यांनी सांगितले.

 

Exit mobile version