Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता चक्क पोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा !

मुंबई प्रतिनिधी | कोरोनामुळे अनेक खासगी कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा देत असल्याचे आपल्याला माहित आहेच. मात्र आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्र पोलिसांनाही याच प्रकारची सुविधा देण्याची घोषणा केली आहे.

करोनाने राज्यात कहर केला असताना मुंबई पोलिसांनाही याचा संसर्ग होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला असताना मुंबई पोलिसांना मात्र २४ तास कर्तव्यावर हजर राहावं लागत आहे. यामुळेच त्यांना करोनाचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ७१ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. याची दखल घेत गृहविभागाने पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला असून त्यांनाही खासगी कंपनीतील कर्मचार्‍यांप्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येणार आहे.

पोलिसांना करोनाची लागण होत असल्याने आता ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. गृहमंत्री म्हणाले की आपण ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश दिला आहे. त्यांनी कर्तव्यावर न येता घरुन काम करायचं आहे. तसंच पोलिसांसाठी वैद्यकीय व्यवस्था तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं.  राज्यात आतापर्यंत ९५१० पोलिसांना करोनाची लागण झाली असून १२३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आता ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचारी घरूनच आपली सेवा बजावणार आहेत.

Exit mobile version