आता स्वच्छ व सुंदर बस स्थानकांना मिळणार पारितोषीक !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य परिवहन महामंडळाने आता राज्यातील बस स्थानकांसाठी स्पर्धा जाहीर केली असून याच्या अंतर्गत स्वच्छ व सुंदर स्थानकांना विभागानुसार पारितोषीके मिळणार आहेत.

एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने राज्यातील ५८० एसटी बस स्थानकं स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी स्वच्छता अभियानाची मोहीम हाती घेतली आहे. याच्याच अंतर्गत जे बस स्थानक स्वच्छ, सुंदर असेल त्या बस स्थानकांना प्रदेश व विभागनिहाय बक्षीस दिली जाणार आहेत. त्यामध्ये पहिला क्रमांक पटकावणार्‍या बस स्थानकांना प्रदेश व विभागनिहाय ५० लाख, २५ लाख, तर १० लाखांचे बक्षीस देऊन गौरवण्यात येईल.

स्वच्छ, सुंदर बस स्थानकांची स्पर्धा ही शहरी विभाग- अ वर्ग, निमशहरी विभाग- ब वर्ग, ग्रामीण विभाग-क वर्ग या तीन विभागातील बस स्थानकांत घेण्यात येईल. ही स्पर्धा मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर, अमरावती अशा सहा प्रादेशिक विभागातही होणार आहे. त्यामध्ये शहरातील मुख्य बस स्थानक, तालुका बस स्थानक व ग्रामीण भागातील गावागावांतील बस स्थानकांची स्वच्छता व सुशोभीकरण याचा समावेश असणार आहे.

एसटी महामंडळाने राज्यातील सर्व ५८० बस स्थानके स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कर्मचारी, तसेच एसटीचे अधिकारी-कर्मचार्‍यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता राज्यातील सर्व बस स्थानकांत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी लोकसहभागाचीही जोड देण्यात येणार आहे. ंयाच्या अंतर्गत राज्यातील सर्व बस स्थानकांतील स्वच्छतेचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षण समिती नियुक्त केली आहे. त्या समितीमार्फत दर दोन महिन्याला परीक्षण करण्यात येणार आहे. त्यात बस स्थानक परिसर, स्वच्छतागृह, प्रवासी बसची स्वच्छता, सुशोभीकरण, टापटीपपणा यावर आधारित गुण दिले जातील. त्याचबरोबर कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी, प्रवाशांसोबत सौजन्यशील वागणे, उत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न, बसचे वेळापत्रक याचाही गुण देताना विचार केला जाणार आहे.

Protected Content