Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्राणरक्षक व्हेंटिलेटरविषयी बदनामी; जिल्हा शल्यचिकित्सकांची याचिका दाखल

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासह प्राणरक्षक व्हेंटिलेटरबाबत खोटी माहिती पसरवित शासनाची बदनामी केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी मुगळीकर यांच्या न्यायालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून त्यांची याचिका दाखल करून घेण्यात आली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासह प्राणरक्षक व्हेंटिलेटरबाबत खोटी माहिती पसरवित शासनाची बदनामी केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी मुगळीकर यांच्या न्यायालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यांची याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळेंसह तिघांनी शासनाची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप आहे. याबाबत पुढील कामकाज मंगळवार, दि.१ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे, शिवराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे यांनी जिल्हा रुग्णालय व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयविषयी विविध खोटे आरोप करून जनमानसात जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हेंटिलेटर खरेदी घोटाळा, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बोगस, मॅमोग्राफी मशीन धूळखात अशा प्रमुख मुद्द्यांवर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केले होते. यात कुठलीही सत्यता नसल्याने हे सर्व आरोप जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी खोडून काढले आहे.

दिनेश भोळे, शिवराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे यांनी प्रतिमा मलीन करून जनतेची दिशाभूल करून शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी तिघांविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी मुगळीकर यांच्या न्यायालयात याबाबत कामकाज चालले. याचिका दाखल करून घेत डॉ. एन. एस. चव्हाण यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले आहे. दिनेश भोळे, शिवराम पाटील, गजानन मालपुरे या तिघांवर प्रत्येकी एक कोटी रुपये अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

प्राणरक्षक व्हेंटिलेटरबाबत बेछूट व खोटे आरोप करून शासनाची प्रतिमा दिनेश भोळे, शिवराम पाटील, गजानन मालपुरे यांनी मलीन केली आहे. प्रथमदर्शनी कटकारस्थान करणे, जनतेची दिशाभूल करणे, तसेच राष्ट्रविरोधी कृत्य करणे असे काम तिघांनी केले आहे. कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेत व्हेंटिलेटर परत गेल्याने आता व्हेंटिलेटरची चणचण भासत आहे. तिघांनीही गेल्या काही महिन्यांपासून विविध माध्यमांद्वारे जे चुकीचे आरोप केले आहे, ते त्यांना आता न्यायालयात सिद्ध करावे लागणार आहे.

दिनेश भोळे, शिवराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे यांचेवर कलम १२० ब, ५००, ५०४, ५०५/१/ब, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल व्हावा म्हणून याचिका दाखल झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांच्या वतीने ऍड. हरिहर पाटील यांनी काम पाहिले.

“कुठल्याही व्यक्तीने आरोप करण्यापूर्वी त्यातील शासकीय प्रक्रिया जाणून घेत सत्यता पडताळावी. त्यानंतर आरोप केले पाहिजेत. रुग्णसेवेत आणि आरोग्य विकासात अडथळा आणण्याचा दिनेश भोळे, शिवराम पाटील, गजानन मालपुरे यांनी प्रयत्न केल्यामुळे प्रत्येक खरेदी प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे. यात जनतेचेच नुकसान झाले आहे. या तिघांचा हेतू काय होता हे आता न्यायालयात सिद्ध होणार आहे” असे डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले.

Exit mobile version