Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘नो व्हीआयपी कल्चर’ : शिव महापुराण कथेत सर्व जण समान !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बडे जटाधारी मंदिर परिसरात सुरू असलेल्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेत व्हीआयपी संस्कृतीला पूर्णपणे फाटा देण्यात आला असून सर्वांना समान पध्दतीत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

बडे जटाधारी मंदिर परिसरातील शिव महापुराण कथेला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. कथेच्या शुभारंभाला सहा ते सात लाख भाविकांनी कथेचे श्रवण केल्याचे दिसून आले आहे. कथेला भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभला असले तरी वाहतुकीच्या नियोजनात त्रुटी झाल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागला. असे असले तरी शिवभक्तांना कथा भावल्याचे दिसून आले.

शिव महापुराण कथेच्या आयोजकांनी आधीच या कथेच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे व्हीआयपी पासेस अथवा एंट्री नसेल असे स्पष्ट केले होते. अगदी कथेचे आयोजक भरतदादा चौधरी, जगदीश चौधरी व तुषार चौधरी हे देखील लोकांमध्ये बसूनच कथा ऐकणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते.

या अनुषंगाने पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून पहिल्या दिवशी पार पडलेल्या कथेच्या दरम्यान व्हीआयपी संस्कृतीला थारा देण्यात आला नाही. यामुळे अगदी थेट पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार राजूमामा भोळे यांनी देखील सर्वसामान्य लोकांमध्ये बसूनच कथेचे श्रवण केले. तर आयोजक चौधरी पिता-पुत्र हे देखील भाविकांमध्येच बसल्याचे दिसून आले. अर्थात, शिव महापुराण कथेमध्ये सर्वांना समान वागणूक हे सुखद चित्र दिसून आल्याने बर्‍याच भाविकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version