ईडीकडून चौकशीत कोणताही दबाव नाही : खडसे

मुंबई प्रतिनिधी । भोसरी येथील भूखंड व्यवहाराच्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे-चौधरी यांनी आज ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली असून तब्बल साडे सहा तासांच्या चौकशीनंतर ते बाहेर पडले आहेत. तर ईडीतर्फे चौकशीत कोणताही दबाव टाकण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आज सकाळी एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी शारदा खडसे या देखील ईडी कार्यालयात आल्या आहेत. भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहार हा शारदा खडसे यांच्या नावावर आहे. त्यामुळे शारदा खडसे यांची सुद्धा चौकशी केली जाणार असल्याचे आज सकाळीच स्पष्ट झाले होते. एकनाथ खडसे यांच्यावर पदाचा दूरूपयोग करून व्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यांनी आपली मुलगी व जावई यांना आपल्या पदाचा वापर करून भूखंडाच्या माध्यमातून मदत केल्याचा ईडीला संशय असून याचीच चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, एकनाथराव खडसे यांच्या सोबत त्यांची कन्या शारदा खडसे-चौधरी हे दुपारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. यानंतर त्यांची तब्बल साडे सहा तास चौकशी करण्यात आली. यानंतर तेथून बाहेर पडतांना प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी आपण ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. तसेच चौकशीत आपल्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला नसल्याचे नमूद केले.

Protected Content