Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकही आमदार अशोक चव्हाणसोबत जाणार नाही-रमेश चेन्नीथला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अशोक चव्हाण यांच्या मानसन्मानात पक्षाने काय कमी केले की त्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागला. कमीत कमी त्यांचे कारण तरी सांगावे असा प्रश्न काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.अशोक चव्हाण यांच्यामागे एकही आमदार, पदाधिकारी जाणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.

अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता.१३) भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काँग्रेसमध्ये दिवसभर बैठकांचे सत्र सुरु होते. त्यासाठी रमेश चेन्नीथला सकाळी मुंबईत सकाळी दाखल झाले. त्यांनी कॉग्रेसच्या मुख्य नेत्यांसोबत गांधी भवन येथे बैठक केली.नांदेड जिल्ह्यातूनही काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावण्यात आले होते.या बैठकीनंतर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण,विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस कार्यकारीणीचे सर्व सदस्य पत्रकारासह त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

अशोक चव्हाण जागा वाटपाच्या बैठकीत होते. दोन दिवसापुर्वी त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पक्ष सोडला. त्यांना दोनदा मुख्यमंत्रीपद दिले, प्रदेशाध्यक्षपद दिले. १८ वर्षे मंत्रीपद तसेच दोन महिन्यापुर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीत स्थान दिले. तरी त्यांनी पक्ष सोडला. चव्हाण यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव असेल. आता भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्यावरचे आरोप धूवून निघेल असा टोलाही चेन्नीथला यांनी लगावला.

Exit mobile version