Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पवार कुटुंबात कलह नाही; अश्रुभरल्या डोळ्यांनी अजित पवारांचा निर्वाळा

Ajit Pawar

मुंबई प्रतिनिधी । पवार कुटुंबात कोणत्याही प्रकारचा कलह नसून निरर्थक आरोपांनी व्यथीत होऊन आपण राजीनामा दिल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान, आपली बाजू मांडतांना त्यांना अश्रू अनावर झाले.

यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकार परिषदेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली. याप्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती होती. प्रारंभी जयंत पाटील म्हणाले की, कालपासून अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. मात्र अजितदादा भावनाप्रधान असून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची माहिती पाटील यांनी दिली. यानंतर अजित पवार म्हणाले की, काल मी अचानक राजीनामा दिल्याने सर्वांना वेदना झाल्या. अशाच प्रकारचा प्रसंगी आधीदेखील उपमुख्यमंत्री असतांना असाच प्रकार घडला होता. आतादेखील मी कुणालाही न सांगता राजीनामा दिला. या वेळेस कुणालाही न सांगता हा प्रकार केल्याने त्यांनी सर्वांची माफी मागितली. ते म्हणाले की, तीन दिवसांपूर्वीच आपण विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना कॉल केला होता. काही दिवसांपासून राजीनाम्याचा विचार आपल्या मनात येत होता. आम्ही सर्व जण शिखर बँकेत कार्यरत होते. यात सर्व जण बिनविरोध निवडून आले होते. आपल्या आधी दिलीप वळसे-पाटील पुण्याचे प्रतिनिधीत्व करत होते. यानंतर मी प्रतिनिधीत्व केले. आम्ही सर्वपक्षीय मान्यवर कार्यरत होतो. यानंतर सहकारमंत्र्यांनी एक हजार कोटींची अनियमितता झाल्याचे सभागृहात सांगितले होते. यानंतर यात पंचवीस हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची आवई उठली. जर एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असता तर ती बँक सुरू राहिली नसती.

अजित पवार पुढे म्हणाले की, मी ३० वर्षांपासून राजकारणात आहे. सहकारातही आम्ही चांगले काम केले आहे. शिखर बँक अस्तित्वात आल्यापासून अनेक मान्यवरांनी येथे काम केले आहे. ही शिखर बँक असून राज्यातील सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने अडचणीत आल्यानंतर त्यांना अनेकदा मदत करावी लागते. अलीकडेच फडणवीस सरकारने चार साखर कारखान्यांना एनपीए असतांनाही नियमाबाहेर जाऊन मदत करण्यात आली. वास्तविक आधीचे कर्ज फिटलेले आहे. कोणतेही कर्ज थकीत नाही. मात्र विरोधकांनी चुकीचे आरोप केले. यानंतर हे प्रकरणी इडीकडे गेले. यात शरद पवार यांचा दुरान्वयानेही संबंध नाही. मात्र असे असतांनाही शरद पवार यांच्यावर आरोप झाले. २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले. यामुळे ज्या साहेबांमुळे मी जिथवर पोहचलो त्यांच्यावर आरोप झाल्याने आपण व्यथीत व अस्वस्थ झालो. यामुळे कुणालाही न सांगता राजीनामा देऊन फोन बंद करून एका नातेवाईकाकडे थांबलो. यातून सर्वांना त्रास झाला. २०१० पासून सुरू असणारी चौकशी ही आता निवडणुकीच्याच कालखंडात कशी सुरू झाली असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. बारामतीमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आपण गेलो होतो. यामुळे ईडीच्या प्रकरणात शरद पवार यांच्यासोबत आपण नव्हतो अशी माहिती त्यांनी दिली.

अजित पवार म्हणाले की, पवार कुटुंब हे आधीपासूनच एकत्र आहोत. आज पवार साहेब हेच कुटुंबाचे प्रमुख आहेत. आता राजीनामा दिला असला तरी घरात कोणताही गृहकलह नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. आज दुपारी एक वाजता शरद पवार यांच्यासोबत विस्तृत चर्चा केली. दरम्यान, त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. आधी ७० हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. मात्र यात काहीही आढळून आले नाही. यातच आता २५ हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्याचे निरर्थक आरोप करण्यात आले याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. हे सांगत असतांना ते भावविवश झाले.

Exit mobile version