Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकनाथराव खडसेंची अटक टळली: दहा दिवसांत देणार कागदपत्रे !

मुंबई प्रतिनिधी । आज दिवसभर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडी अटक करेल अशी राजकीय वर्तुळात व विशेष करून विरोधकांमध्ये जोरदार चर्चा असतांना मॅरेथॉन चौकशीनंतर ते परतले आहेत. यामुळे ईडी विरूध्दचा पहिला डाव त्यांनी यशस्वी केल्याचे मानले जात आहे. तर ईडीला आवश्यक असणारी कागदपत्रे दहा दिवसात देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.

भोसरी येथील वादग्रस्त भूखंडाच्या खरेदी प्रकरणी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर याच प्रकरणाची सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीतर्फे चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने काल खडसे यांचे मोठे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली. ही जमीन गिरीश चौधरी आणि मंदाकिनी खडसे यांनी संयुक्तरित्या खरेदी केली असून एकनाथराव खडसे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा चौकशीत ठपक ठेवण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणी खडसे दाम्पत्याला अटक होऊ शकते अशी जोरदार चर्चा होती. यातच काल सायंकाळी खडसे यांना ईडीने समन्स बजावून आज अकरा वाजता चौकशीसाठी बोलावले. परिणामी याच चौकशीत खडसे यांना अटक करण्यात येईल असे मानले जात होते.

दरम्यान, रात्री सव्वाआठच्या सुमारास तब्बल नऊ तासांची मॅरेथॉन चौकशी पूर्ण झाल्यानंतर एकनाथराव खडसे हे ईडीच्या मुंबई येथील कार्यालयातून बाहेर पडले. त्यांनी ईडीला चौकशीत पूर्ण सहकार्य केले. ईडीला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे ही दहा दिवसांच्या आत देण्याचेही त्यांनी सांगितले. आवश्यक असल्यास चौकशीसाठी दररोज येण्याची तयारी देखील त्यांनी दर्शविली आहे. यानंतर ईडीच्या कार्यालयातून ते आपल्या निवासस्थानी परतले आहेत.

Exit mobile version