Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : उपाध्यक्षांच्या अविश्‍वास प्रस्तावासह आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टाची ११ जुलैला सुनावणी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली असून त्यांच्यावरील अविश्‍वास प्रस्तावासाठीची कागदपत्रे आणि ई-मेलवरून पाठविण्यात आलेल्या नोटीबाबत बाजू स्पष्ट करण्यासाठी नोटीस बजावली आहे. तर या प्रकरणी केंद्र सरकारसह सर्व पक्षकारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. तसेच या प्रकरणी ११ जुुलै रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी उपाध्यक्षांतर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी पाच दिवसांची मुदत देखील कोर्टाने दिली आहे.

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना नेते नगरविकास मंत्री हे आपल्यासोबत समर्थकांचा गट घेऊन सूरतला रवाना झाले. तेथून ते गुवाहाटीकडे गेले. आधी १५-१६ आमदार सोबत असलेल्या शिंदेंना आज तब्बल ५० आमदारांचे समर्थन आहे. यात शिवसेनेचे ४१ तर अपक्ष ९ आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणी लागलीच कायदेशीर लढाई सुरू झाली. यात शिवसेनेने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदाराचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली असून त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या संदर्भात त्यांना अपात्रतेच्या नोटीसा मिळाल्या असून यावर आज दिनांक २७ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुलासा सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. याच्या विरोधात संबंधीत आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

तर, दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांना पक्षाचे कोणतेही निर्णय घेता येऊ नयेत म्हणून त्यांना गटनेते पदावरुन बाजूला सारून हे पद अजय चौधरी यांना देण्यात आले आहे. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून हे निर्णय रद्द करावेत अशी मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे यांच्यातर्फे हरीश साळवे तर शिवसेनेतर्फे कपील सिब्बल यांनी बाजू मांडली. यासोबत दोन्ही गटांतर्फे अनुक्रमे मुकुल रोहतगी आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी त्यांना सहकार्य केले. यातील एक याचिका ही आमदार भरत गोगावले यांनी दाखल केली असून दुसरी याचिका ही स्वत: एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेली आहे.

यातील शिंदे यांनी आपल्या याचिकेत शिवसेनेच्या ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढून घेतल्याचा दावा केला आहे. यामुळे आता मविआ सरकार अल्पमतात आल्याचा दावा सरकारने केला आहे. याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत हे आपल्यासह समर्थक आमदारांना धमकावत असल्याचा आरोप केला आहे. यासाठी त्यांनी खासदार राऊत यांच्या काही क्लीप्स आणि याच्या लिंक्स देखील याचिकेसोबत जोडल्या आहेत.

दरम्यान, दुपारी दीड वाजेच्या सुमारास न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवरील सुनावणी सुरू झाली. यात त्यांच्या वकिलांनी अविश्‍वास प्रस्ताव असतांना उपाध्यक्ष हे नोटीस काढू शकत नसल्याचा युक्तीवाद केला. यावर कोर्टाने तुम्ही कोर्टात का गेले नाहीत ? अशी विचारणा केली. यावर वकिलांनी राज्यात असे वातावरण नसल्याचे नमूद केले. कोर्टात न जाण्यासाठी तीन कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी त्यांनी संजय राऊत यांच्यातर्फे आमच्या गटाला धमक्या दिल्या जात असल्याकडे लक्ष वेधून घेतले. यावर कोर्टाने विधानसभा उपाध्यक्षांना आपण काही निर्देश देऊ शकत नाही. तथापि, तुम्हाला कमी वेळ मिळाला आहे का ? अशी विचारणा केली. यावर कौल यांनी आमदारांना किमान नोटीशीनंतर १४ दिवसांचा वेळ मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र उपाध्यक्षांनी येथे फक्त ४८ तासांचा वेळ दिल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांचे वकील ऍड. नीरज किशन कौल यांनी केली.

शिंदे यांचे वकील कौल पुढे म्हणाले की, राज्य सरकार अल्पमतात असून देखील ते कार्यरत कसे ? अशी विचारणा देखील यांनी केली. तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पाठविलेली नोटीस रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केली. यासाठी त्यांनी २०१६ साली नवम रेबीया विरूध्द अरूणाचल प्रदेश सरकार या खटल्याचा संदर्भ देखील त्यांनी दिला. दरम्यान, नीरज किशन कौल यांनी युक्तीवाद सुरू असतांना न्यायमूर्तींनी दोन मिनिटांचा विराम घेतला. यानंतर सुरू झालेल्या सुनावणीत कौल यांनी उपाध्यक्षांनी आधी बहुमत सिध्द करावे, मगच अधिकार गाजवावेत अशी मागणी केली.

यानंतर शिवसेना आणि सुनील प्रभू यांच्यातर्फे अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद सुरू केला. शिंदे गटाला नोटीशीबाबत काही आक्षेप असतील ते ते हायकोर्टात का गेले नाहीत ? अशी विचारणा त्यांनी केली. याबाबत कौल यांनी कोणतेही कारण दिले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधून घेतले. जोवर विधानसभाध्यक्ष वा उपाध्यक्ष निर्णय घेत नाही तोवर कुणी हस्तक्षेप करू शकत नसल्याचे ते म्हणाले. यासाठी त्यांनी १९९२ सालच्या किहोटो प्रकरणाचा दाखला देखील दिला. या निकालानुसार उपाध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार असून त्यांच्या निर्णयाला आव्हान देता येणार नसल्याचा युक्तीवाद त्यांनी केला. या संदर्भात कोर्ट फक्त अंतरीम आदेश देऊ शकते असेही त्यांनी सूचित केले. उपाध्यक्षांच्या अधिकारात कोर्ट ढवळा-ढवळ करू शकत नसल्याचा युक्तीवाद त्यांनी याप्रसंगी केला. यासाठी त्यांनी आर्टीकल-२१२ चा संदर्भ दिला आहे. यावर कोर्टाने कलम १७९ (सी) याच्या अंतर्गत उपाध्यक्षांना हटविण्याची तरतूद असल्याचे नमूद केले. तर आर्टीकल २१२ नुसार विधीमंडळाच्या कामकाजाची माहिती कोर्ट घेऊ शकते असेही सांगण्यात आले.

यानंतर शिवसेनेतर्फे देवदत्त कामत यांनी युक्तीवाद सुरू केला. यात कोर्टाने उपाध्यक्षाच्या निर्णयांना कोर्टात आव्हान देता येणार असल्याचे सांगितले. कोहोटा प्रकरणाचा निकाल पाहिला असून यातून आव्हान देता येणार असल्याचे कोर्ट म्हणाले. बहुमत असेल तर उपाध्यक्ष हे अविश्‍वास विश्‍वास फेटाळू शकतात असे महत्वाचे निरिक्षण कोर्टाने नोंदविले. अर्थात पहिल्यांदा उपाध्यक्षांनी आपल्यावरील विश्‍वास सिध्द करावा असे यात प्रत्यक्षपणे सूचित करण्यात आले. यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी उपाध्यक्षांना ×एका अनधिकृत ई-मेलवरून चुकीच्या पध्दतीने अविश्‍वास प्रस्ताव पाठविण्यात आला असून याचमुळे तो फेटाळण्यात आल्याचे सांगितले. याबाबत उपाध्यक्षांनी सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले. ही कागदपत्रे सादर केल्यास दुसरी बाजू समोर येणार असल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले.

यावर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे वकील राजेश धवन यांनी अधिकृत मेलवरून प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे जर नोटीसच अधिकृत नसेल तर १४ दिवसांचा प्रश्‍नच येत नसल्याचे न्यायमूर्ती म्हणाले. या संदर्भात उपाध्यक्षांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. यावर वकिलांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे कोर्टात कागदपत्र सादर करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच गटनेत्याच्या निवडीनंतर अनधिकृत ई-मेलवरून प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती देखील देवदत्त कामत यांनी दिली. हा अविश्‍वास प्रस्ताव बोगस असल्याने यावरून विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज नसल्याचा युक्तीवाद देखील त्यांनी केला. उपाध्यक्षांना हटविण्यासाठी कारणे द्यावी लागतात याकडे देखील त्यांनी लक्ष वेधून घेतले.

यावर न्यायमूर्तींनी या प्रकरणी सर्व पक्षकारांना नोटीस बजावत ११ जुलै रोजी सुनावणी घेणार असल्याचा निर्णय दिला. तसेच या प्रकरणी उपाध्यक्षांतर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी पाच दिवसांची मुदत देखील कोर्टाने दिली आहे. कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे नरहरी झिरवाळ यांना दिलासा मिळाला आहे. तथापि, अपात्र आमदारांनाही यामुळे ११ जुलैपर्यंत मुदत मिळणार आहे. त्यांना आज सायंकाळपर्यंत नोटीस देण्याची सक्ती राहणार नसल्याने त्यांना देखील दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version