नीट यूजी परीक्षेचे समुपदेशन स्थगित


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मेडिकल काउंसलिंग कमीशनने नीट यूजी परीक्षेबाबत समुपदेशन पुढे ढकलले आहे. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहे. याआधी शुक्रवारी, सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त नीट यूजी २०२४ परीक्षेसाठीचे समुपदेशन पुढे ढकलण्यास नकार दिला होता. तसेच ही परीक्षा प्रक्रिया मनात येईल तेव्हा सुरू आणि बंद करता येणार नाही असे देखील कोर्टाने म्हटले होते. समुपदेशनाची प्रक्रिया आज ६ तारखेपासून सुरू होणार होती, मात्र, ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

नीट यूजीसाठीचे समुपदेशन वैद्यकीय समुपदेशन आयोगाने म्हणजे एमसीसीने पुढे ढकलले आहे. समुपदेशनाची कोणतीही नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. अखिल भारतीय कोट्यातील जागा म्हणजेच नीट यूजीचे एआयक्यु समुपदेशन आजपासून सुरू होणार होते, मात्र ते आता रद्द करण्यात आले आहे. नीट यूजीतील रँकच्या आधारावर, एमबीबीएस आणि बीडीएस वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. दरम्यान, नीट परीक्षा पेपेयरफूटी प्रकरणी सुप्रीम कोर्टात ८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ४ जून रोजी नीट युजी परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. यात ६७ टॉपर्ससह एकूण १३.१६ लाख विद्यार्थी या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर २३ जून रोजी ग्रेस गुण मिळालेल्या १५६३ उमेदवारांची देखील फेरपरीक्षा घेण्यात आली. सुधारित निकाल जाहीर झाल्यानंतर, नीट युजी टॉपर्सची संख्या ही ६७ वरून ६१ झाली आहे.

नीट यूजी समुपदेशन प्रक्रिया ही प्रामुख्याने पाच टप्प्यात होते. यात ऑनलाइन नोंदणी, पर्याय भरणे आणि लॉक करणे, सीट वाटप आणि शेवटी वाटप केलेल्या कॉलेजला अहवाल देणे या बाबींचा समावेश आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अनेक आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते. ५ मे रोजी झालेल्या परीक्षेतील गैरप्रकार आणि परीक्षा नव्याने आयोजित करण्याच्या याचिकांसह संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालय ८ जुलै रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. पेपरफुटीसह विविध आरोपांमुळे अनेक शहरांमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. यासोबतच लोकसभेत देखील विरोधकांनी सरकारवर या प्रकरणी हल्लाबोल केला आहे.