Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ठाकरेंना पुन्हा धक्का : निलम गोर्‍हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे यांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अखेर एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश घेतला आहे.

आज सकाळपासूनच विधानपरिषदेतील एक मातब्बर व्यक्तीमत्व शिंदे यांच्या गटात दाखल होणार असल्याची चर्चा सुरू होती. यानंतर हे नाव म्हणजे निलम गोर्‍हे असल्याची माहिती समोर येताच खळबळ उडाली. ठाकरे गटाच्या नेत्यांनी या वावड्या असल्याचे सांगितले. मात्र आज दुपारी निलम गोर्‍हे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे.

याप्रसंगी निलम गोर्‍हे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना योग्य मार्गाने जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच अधिकृत आहे. यामुळे आपण त्यांच्या सोबत जात असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी दिली आहे.

Exit mobile version