Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुसर्‍या हरीत क्रांतीची आवश्यकता – डॉ. मेश्राम

lab to land amalner

अमळनेर प्रतिनिधी । शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी जैविक, शाश्‍वत आणि सर्व समावेशक अशी दुसरी हरीतक्रांती गरजेची असल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांनी केले. ते येथील कार्यशाळेच्या उद्घाटनपर सत्रात बोलत होते.

अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात प्रयोगशाळा ते जमीन उपक्रमांतर्गत दोन दिवसीय निवासी शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उदघाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा रायसोनी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान कुलगुरू प्रा. पी.पी.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून तत्त्वज्ञान केंद्राचे मानद संचालक डॉ.एस.आर.चौधरी, कार्याध्यक्ष प्रा. सुधीर पाटील उपस्थित होते.

डॉ. सुधीर मेश्राम यांना ग्लोबल बायोटेक फोरमच्या वतीने काही महिन्यांपूर्वी जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी ही पुरस्कारप्राप्त रक्कम खान्देशातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या सहा कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून या समारंभात दिली. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील कै.नथू नांद्रे (मु.पो.छडवेल पखरून, ता.साक्री, जि.धुळे), कै.दीपक धोबी (मु.पो.मेहेरगाव, ता.जि.धुळे),कै.सागर पाटील (कुकावल, ता.शहादा), कै.बन्सिलाल तांबोळी (रनाळे,ता.जि.नंदूरबार), कै.भिमराव वाघ( मु.गोरनाळे, ता.जामनेर,जि.जळगाव), कै.अनिल साळुंखे (मु.चांदसर, ता.धरणगाव,जि.जळगाव) या सहा आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या परिवाराला हे अर्थसहाय्य करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. मेश्राम म्हणाले की, स्वदेशी आणि शाश्‍वत स्वरूपाचे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. जैविक खते आणि जैविक किटकनाशके यांचा वापर कसा करावा याबाबत प्रयोगशाळा ते जमीन या उपक्रमांतर्गत खान्देशात अनेक कार्यशाळा घेण्यात आल्या.त्यासाठी आपले पेटंट खुले करून दिले. ज्या भागात या कार्यशाळा घेण्यात आल्या त्या भागात शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले. दुर्गम भागापर्यंत व सर्व समावेशक असे शेती धोरण आखून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. ग्लोबल बायोटेक फोरम त्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी प्रा.सुधीर मेश्राम यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतूक करून प्रयोगशाळा ते जमीन हा उपक्रम भविष्यात ही विद्यापीठाकडून सुरू राहणार असल्याचे सांगुन त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याची माहिती दिली. प्रास्ताविक समन्वयक प्रा.भुषण चौधरी यांनी केले. प्रा.एस.आर.चौधरी यांनी प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचा आढावा सांगितला.प्रा.सुधीर पाटील यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.प्रा.राधिका पाठक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पीएच.डी प्राप्त झाल्याबद्दल तत्त्वज्ञान केंद्र सल्लागार समितीचे प्रा.डॉ.धीरज वैष्णव व तंत्रज्ञ अधिकारी डॉ.स्वप्नील खरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.स्वप्नील खरे यांनी केले. अधिसभा सदस्य दिनेश नाईक यांनी आभार मानले.यावेळी प्राचार्य ज्योती राणे, प्रा.डी.डी.पाटील,प्रा.सुनील गरूड आदी उपस्थित होते.

या दोन दिवसीय कार्यशाळेत विद्यापीठातील प्रा.भुषण चौधरी, प्रा.ए.बी.चौधरी,प्रा.एन.डी. दंडी,तंत्र सहाय्यक डॉ.स्वप्निल खरे यांनी जैवतंत्रज्ञान, शाश्‍वत व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.समारोप प्रसंगी शेतकरी प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेतून शेतीच्या नवनवीन तंत्राची माहिती मिळाली असून त्याचा निश्‍चित उपयोग होईल अशी भावना शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केली.

Exit mobile version