Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनी लाँड्रिंग प्रकरण : नवाब मलिकांचा कारागृहातील वाढला ‘मुक्काम’

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा ।  मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढवण्यात आला आहे. कारण त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत न्यायालयाने वाढ केली आहे.

नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. नवाब मलिक यांना तुरुंगात बेड आणि अथंरूणासोबत एक खुर्ची देण्यास मुंबई सत्र न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना पाठदुखी व इतर व्याधींचा त्रास होत असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता मलिक यांनी कोर्टाकडे बेड, खुर्चीची मागणी केली होती.

नवाब मलिक यांच्यावर काय आहे आरोप?  

नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. 7 मार्च रोजी त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.

 

Exit mobile version