Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवाब मलिक राष्ट्रवादीच्या ‘या’ गटात सहभागी

नागपूर-वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्याची माहिती समोर आलेली. त्यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला. त्यांच्यावर बरेच दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर मलिक आज पहिल्यांदाच विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवासाच्या निमित्ताने नागपूरला आले.

नवाब मलिक पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिसल्यानंतर अनेकांची उत्सुकता वाढली. आता नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात जातील? अशीच चर्चा सुरु झाली. अखेर त्याचं उत्तर मिळालं आहे. नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मलिक विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसले. तसेच नवाब मलिक विधानसभेत पोहोचताच अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात बसले. त्यामुळे ते आता अजित पवार गटाचे सदस्य झाल्याचं स्पष्ट झालंय.

अजित पवार यांनी नवाब मलिकांच्या प्रश्नावर माध्यमांना उत्तर दिलं. “सभागृहात कुणी कुठे बसावं हा संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. त्यामुळे त्यांना मधल्या काळात काय-काय घटना घडल्या ते तुम्हाला माहिती आहे. ते आज सकाळी आले. त्यांचा मला फोन आला. मलाही कळल्यानंतर मी त्यांचं स्वागत आहे म्हणून फोन केला होता”, असं अजित पवारांनी सांगितलं.

विधान परिषदेत नवाब मलिकांवरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली. देशद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, असं सत्ताधारी म्हणाले होते. नवाब मलिक यांच्याबाबत भूमिका स्पष्ट करा, असंही अंबादास दानवे म्हणाले. अंबादास दानवे यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. नवाब मलिक जेलमध्ये असताना त्यांना मंत्रीपदावरुन का काढलं नाही? असा सवाल फडणवीसांनी केला. आम्ही कुणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही, असं फडणवीस म्हणाले.

 

Exit mobile version