Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१ जानेवारीपासून रेशन दुकानदारांचा राष्ट्रव्यापी संप

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नववर्षाच्या सुरवातीपासून अर्थात १ जानेवारी पासून रेशन दुकानदारांचा देशव्यापी संप सुरू होत असून यात सर्व दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

या संदर्भात रेशन दुकानदारांच्या संघटनेने पत्रक जारी केले आहे. यात म्हटले आहे की, अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे कडून या पत्राद्वारे राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार बंधू-भगिनींना असे आवाहन करण्यात येत आहे की, आपण सर्वांनी ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली, या देशपातळीवरील संघटनेने सोमवार, दिनांक ०१ जानेवारी, २०२४ पासून अनिश्चित काळासाठी पुकारलेल्या रेशन बंद आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली रेशन दुकाने बंद ठेवावीत, या काळात आपण सर्वांनी आपापल्या दुकानातील ई-पॉस मशीन कार्यान्वित करू नयेत, तसेच कोणत्याही प्रकारे धान्याची उचल व वितरण देखील करू नयेत.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, की, सार्वजनिक वितरण प्रणालीची सर्वात शेवटची कडी असणार्‍या राज्यातील सर्व ५३,००० रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र व राज्य शासन पूर्णपणे उदासीन आहे. आपण वेळोवेळी केलेल्या आंदोलनाची व मोर्चाची शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही, महासंघाने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन शासनामार्फत दिनांक १२ डिसेंबर, २०२३ रोजी सचिव, यांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूर, येथे महासंघाच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली असली, तरीही त्यामध्ये फक्त आश्वासन देण्यापलीकडे कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
त्यामुळे महासंघाच्या वतीने नाईलाजास्तव ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली या देशपातळीवरील संघटनेने दिनांक ०१ जानेवारी, २०२४ पासून अनिश्चित काळासाठी पुकारलेल्या रेशन बंदआंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपले संघटनात्मक मतभेद बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाकडून करण्यात येत आहे. या आंदोलनाचे घोषवाक्य पचास हजार से कम नही| कमिशन मे कुछ दम नही| असे आहे.

दरम्यान, या अनुषंगाने सोमवार, दिनांक ०१ जानेवारी, २०२४ पासून आपल्या रेशन बंद आंदोलनाची सुरुवात होत आहे. या आंदोलनामध्ये प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदार हे तहसील कार्यालयासमोर संविधानिक मार्गाचा अवलंब करून निदर्शने, धरणे, घंटा नाद, थाळी नाद या प्रकारातील आंदोलन करणार असल्याचेही या पत्रकात नमूद केले आहे.

Exit mobile version