Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “आंतरशालेय विज्ञान स्पर्धेने” राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्ह्यातील विविध स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील उद्याच्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर् स्पर्धा जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. या वर्षीच्या प्रदर्शनात विविध शहरातील स्कूल सहभागी झाल्या होत्या तर ३२ प्रोजेक्ट मांडण्यात आले होते. तिसरी ते सातवी, सहावी ते आठवी व नववी ते बारावी अशा तीन गटामध्ये स्पर्धा झाली. यावेळी प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह विजेत्यांना देण्यात आली.

विज्ञान प्रदर्शनासाठी एआय इन एव्हरीडे लाईफ, रोबोटिक्स, रोबोवेअर, टेक्नॉलॉजी इन हेल्थकेअर अँड मेडिसिन, एरोस्पेस, एरोडायनामिक्स, आयओटी, इंटरनेट ऑफ थिंग्स, वेबेथोन, कोडकॉम्बैट असे विषय देण्यात आले होते आणि पोस्टर्स स्पर्धेसाठी सस्टेनेबल एनर्जी, कन्सर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स असे विविध विषय देण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनात तिसरी ते सातवी गटात पहिले बक्षीस – दक्ष अमित शर्मा (Li-Fi तंत्रज्ञान), दुसरे – अबीर ठाकूर व आरव वराडे(शाश्वत ऊर्जा) तसेच कौशिकी चौबे व शनाया सोनी (सौर यंत्रणा) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. तर सहावी ते आठवी गटात पहिले बक्षीस – मिहिरसिंग मौर्य व नैतिक कोठारी(आरसी प्लेन) दुसरे – विहान मुथा व कलश मुंदडा (मॅग्लेव्ह ट्रेन) तर तिसरे बक्षीस समर्थ नेमाने व उदय बोरसे(स्लीपलेस गॉगल) यांना देण्यात आले. विशेष पारितोषिक असलेले सर्वोत्तम नाविन्यपूर्ण मॉडेल म्हणून हिमांशू रंगलानी व स्मिथ सावना यांच्या एअर लाँचरला तसेच जैनील गाला यांच्या सर्विंग रोबोटला देण्यात आले.

बक्षीस वितरण कार्यक्रमात उपस्थित विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांमधून भविष्यात एखादा वैज्ञानिक घडणार आहे. यासाठी शालेय जीवनातच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याची गरज आहे. या बालवैज्ञानिकांकडूनच भारत देशाला दुसरे नोबेल पारितोषिक मिळवून देण्याची अपेक्षा आहे. ही जबाबदारी भावी पिढी नक्कीच स्वीकारुन आपली वाटचाल करेल, असा विश्‍वास व्यक्त करत विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण बायोकेमिस्ट्रीमधील उद्योजक डॉ. निलेश तेली यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका शर्मा यांनी केले तर आभार लीना त्रिपाटी व अश्विनी घोगले यांनी मानले.

Exit mobile version