Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर तालुक्यात राष्ट्रीय जंतनाशक सप्ताहाची सुरुवात

जामनेर प्रतिनिधी । सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग जि.प.जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने २१ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासह तालुक्यात राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

जंतसंसर्गामुळे(वर्म) वय वर्षे १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलामुलींमध्ये विविध प्रकारचे दुष्परिणाम दिसुन येतात. जंतामुळे रक्तक्षय होऊन बालकांचा विकास व शारीरिक वाढ यावर मोठया प्रमाणात दुष्परिणाम दिसून येतो त्यामुळेच बालकांचे कुपोषण होऊन त्यांची वाढ खुंटते.जंतांचा संसर्ग अधिक प्रमाणात झाल्यास बालके सतत आजारी पडतात त्यांच्यामध्ये थकवा जाणवणे, पोट दुखणे,एकाग्रता कमी होणे,शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते.

यामुळे वर्षातून दोन वेळा “जंतनाशक मोहीम”आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येते.या मोहिमेत वय वर्षे१ ते १९ वर्षे वयोगटातील अंगणवाडी, मराठी शाळा, हायस्कुल,आश्रम शाळा, अनुदानित शाळा,खाजगी शाळा,कॉलेज, या ठिकाणी नोडल शिक्षकांकडून तसेच या वयोगटातील शाळाबाह्य मुलामुलींना अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या द्वारे जंतनाशक गोळीची मात्रा दिली जात आहे.तसेच जंतनाशक मात्रेबरोबरच त्यांना हात स्वच्छ धुणे,विशेषतः शौच्यानंतर व जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुणे,शौच्यास उघड्यावर न बसता शौच्यालयाचा वापर करणे,बाहेर खेळतांना पायात बूट किंवा चपला घालणे, व्यवस्थीत शिजलेले अन्न खाणे,निर्जंतुक व स्वछ पाण्यात भाज्या व फळे धुणे,नियमित नखे काढणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

जंतनाशक गोळीच्या मात्रेचे सेवन केल्यास व वरील नियमांचे पालन केल्यास रक्तक्षय कमी होऊन बालकांचे आरोग्य सुधारते त्यांची झपाट्याने वाढ होऊन प्रतिकार शक्ती वाढते. आरोग्य चांगले राहिल्यामुळे आकलन शक्ती व एकाग्रता वाढते. या मोहिमेत आरोग्य विभागाबरोबरच अंगणवाडी विभाग व शिक्षण विभाग यांची महत्वाची भूमिकाबजावत आहे.

जामनेर तालुक्यात एकूण २४५१४२ बालकांना जंतनाशक  डोस ची मात्रा देण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे दिली.

 

 

Exit mobile version