Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बडोदा येथे जानेवारीत अ.भा. अल्पसंख्यक जैन महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन

 

मुंबई, वृत्तसंस्था | महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोशियारी यांची आज (दि.१७) ऑल इंडिया मायनोरिटी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गाँधी, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री सुशिल टाटीया व मुंबई प्रदेशचे प्रकाश चोपडा यांनी भेट घेतली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या भेटी दरम्यान येत्या जानेवारीत दि.११ व १२ रोजी गुजरातमधील मणिलक्ष्मी तीर्थ, बडोदा येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण राज्यपालांनी स्वीकारले आहे.

 

याप्रसंगी जैन अल्पसंख्यक महासंघाचे कार्य व विविध मागण्यांविषयी सविस्तर चर्चा करण्यात येऊन कोशियारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रारंभी राज्यपालांचा शाल श्रीफळ देवून राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी सत्कार केला तर राज्यपालांच्या सुंदर चित्रकृतीची आकर्षक फ्रेम प्रदेश महामंत्री सुशिल टाटीया यांचे हस्ते महामहिम यांना भेट म्हणून देण्यात आली. स्वतःच्ये हुबेहूब चित्र बघून कोशियारी थक्क झाले आणि कलेला त्यांनी मनसोक्त दाद दिली.
महासंघाच्या विविध कामकाजाचा प्रामुख्याने कँसर डिटेक्शन बस, महिला आधार अनुष्ठान, पूरग्रस्तांसाठी केलेल्या कामांचे राज्यपालांनी तोंड भरून कौतुक केले व सहकार्याची भावनाही व्यक्त केली. महासंघाची कार्यपुस्तिका श्री.चोपडा यांच्या हस्ते त्यांना भेट देण्यात आली. सदरच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा लवकरच जाहीर करण्यात येणार असून जैन समाजातील तमाम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने अधिवेशनात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री सुशिल टाटीया आदींनी केले आहे.

Exit mobile version