Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाथाभाऊ, ‘आता हीच ती वेळ’, येऊ द्या बाहेर सीडी किंवा पीडी ! : सोशल मीडियात धमाल

जळगाव-जितेंद्र कोतवाल ( एक्सक्लुझीव्ह स्पेशल रिपोर्ट ) | लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीने आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह क्लीप्स जगासमोर आल्याचा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली असतांनाच सोशल मीडियातून याबाबत मजेशीर प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. Eknath Khadse CD & PD यात आमदार एकनाथराव खडसे यांनी अनेकदा जाहीरपणे दावा केलेली ‘सीडी’ वा ‘पीडी’ (पेन ड्राईव्ह ) कधी येणार ? अशी विनोदी पध्दतीत विचारणा देखील करण्यात येत आहे.

(Image Credit Source: Live Trends News)

‘लोकशाही मराठी’ या वृत्तवाहिनीने आज भाजपचे माजी खासदार तथा ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी सोमय्यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओज हे जगासमोर आल्याचा दावा केला आहे. यातील काही क्लीप्समध्ये सोमय्या हे समोरच्या व्यक्तीशी अश्‍लील चॅटींग करतांना दिसून येत आहेत. खरं तर ही वैयक्तीक चॅटींग असून दोन व्यक्तींची हरकत नसेल तर ते अशा पध्दतीत बोलू शकतात. यात त्रयस्थ कुणीही व्यक्तीला आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. आमची हीच भूमिका आहे. तथापि. किरीट सोमय्या यांनी आधी नैतिकतेचा आव आणत अनेक मान्यवरांवर जे आरोप केले आहेत ते पाहता, आणि ते स्वत: राजकारणात असल्याने नैतिकतेच्या कसोटीवर त्यांचे कृत्य हे नक्कीच वादाच्या भोवर्‍यात सापडणारे आहे. याचमुळे आता राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर टिका करण्यास प्रारंभ केला आहे. या क्लीप्स जर ओरीजनल असतील तर सोमय्या यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे बहुतांश राजकीय विरोधी पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे असल्याची बाब देखील ही या दृष्टीने लक्षणीय आहे.

हे देखील वाचा : भाजपने काढला पीडी, आता सीडी कधी लागणार ?

आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास किरीट सोमय्या यांच्याबाबतचा गौप्यस्फोट ‘लोकशाही मराठी’ या वाहिनीवर सुरू होताच याचा सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. अवघ्या काही मिनिटांमध्येच हा विषय ‘ट्रेंडींग’ला आला असून सर्वत्र याचीच चर्चा सुरू आहे. यातील बहुतांश पोस्टचा सूर हा किरीट सोमय्या यांच्या दुटप्पी वर्तनाची खिल्ली उडविणारा आहे. ईडीचा धाक दाखवून त्यांनी अनेकांना अडचणीत कसे आणले ? याची आठवण करून देत बहुतांश युजर्स हे त्यांचा बाजार उठल्याची टिका करत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून सोमय्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. एका अर्थाने सोमय्या हे सोशल मीडियात ट्रोलींग होत आहेत.

दरम्यान, स्थानिक पातळीचा विचार केला असून अनेक युजर्सकडून किरीट सोमय्यांची खिल्ली उडवतांनाच आमदार एकनाथराव खडसे यांच्या आधीच्या वक्तव्यांशी त्यांचा संबंध जोडला जात आहे. आज सोमय्यांच्या क्लिप बाहेर आल्यामुळे ”आता नाथाभाऊ सांगत असलेली सीडी वा पीडी ( पेन ड्राईव्ह ) कधी बाहेर येणार ?” अशी विचारणा अनेक युजर्स करत आहेत. तर काही युजर्स अगदी धमाल विनोदी पध्दतीत ”नाथाभाऊ आता हीच ती वेळ. . .येऊ द्या सीडी किंवा पीडी !’ अशा कॉमेंट करत आहेत. भाऊ आता कशाची वाट पाहत आहेत ? अशी विचारणा देखील अनेक युजर्स करत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात आ. एकनाथराव खडसे यांची सीडीबाबत मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. आपल्याकडे सीडी असून यात जळगाव जिल्ह्यातील एका नेत्याच्या रासलीला असल्याचे त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. अगदी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करतांना त्यांनी बेडरपणे ”तुम्ही ईडी लावली तर आम्ही सीडी लाऊ !” असे सांगितले होते. अर्थात, त्यांच्यावर ईडी लागली तरी नाथाभाऊंनी सीडी कधी काढलीच नाही. अलीकडच्या काळात ते आता सीडीवर फारसे बोलतांना दिसत नाहीत. मध्यंतरी जामनेर तालुक्यातील राजकीय नेते प्रफुल्ल लोढा यांनी देखील सीडी प्रकरणाची हवा निर्माण केली. मात्र ते देखील काहीही ठोस सांगू शकले नाहीत. तर, सामाजिक कार्यकर्ते विजय भास्कर पाटील यांनी देखील एका पत्रकार परिषदेत आपल्याकडे त्या सीडी व पेन ड्राईव्ह असल्याचा दावा केला असला तरी त्यांनी देखील पुढे याबाबत काहीही भाष्य केले नाही.

या पार्श्‍वभूमिवर, आता किरीट सोमय्या यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट झालेला असतांना सोशल मीडियात नाथाभाऊंकडे असणारी कथीत सीडी चर्चेचा विषय बनलेली आहे. तर आता सीडीचा नव्हे तर पेन ड्राईव्हचा म्हणजेच पीडीचा जमाना असल्याने भाऊंनी पेन ड्राईव्ह तरी जगाला दाखवावा अशी मागणी अनेक युजर्स करतांना दिसून येत आहेत. आणि आज लोकशाही मराठी या वाहिनीने किरीट सोमय्या यांच्याबाबत गौप्यस्फोट केल्यामुळे सर्वत्र आक्षेपार्ह क्लीपची चर्चा सुरू असतांना नाथाभाऊंना ‘सीडी’ वा ‘पीडी’ काढण्यासाठी हीच ती योग्य वेळ ! असल्याचे देखील अनेक युजर्सचे म्हणणे आहे. असे झाले तरी तर नाथाभाऊंचा सीडी आणि पीडीचा ‘फुसका बार’…अगदी समर्पक सांगावयाचे तर जुमलाच ठरेल अशी मल्लीनाथी देखील अनेक जण करतांना दिसून येत आहेत.

Exit mobile version