Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नरेंद्र मोदी भ्रष्टच, त्यांना तुरुंगात टाका : राहुल गांधी

नवी दिल्ली (प्रतिनिधी) अनिल अंबानी यांनी राफेल करार होण्यापूर्वी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीचा धागा पकडत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राफेल विमान करारामध्ये मोदी यांनी अनिल अंबानींसाठी मध्यस्थाची भूमिका बजावली होती, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.एवढेच नव्हे तर, नरेंद्र मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून, अनिल अंबानी यांना गोपनीय माहिती देऊन त्यांना गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला आहे. त्यासाठी त्यांच्यावर खटला चालवून त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.

राफेल विमान करारावरून राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा चौफेर हल्ला चढवला आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, राफेल करारप्रकरणी एक ईमेल समोर आला आहे. एअरबस कंपनीचे एक्झिक्युटिव्ह यांच्याशी संबंधित असलेल्या या ईमेलमध्ये फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात अनिल अंबानी गेले होते, असा उल्लेख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर आल्यानंतर एक करार होईल, यात अनिल अंबानी यांचे नाव असेल, असे अनिल अंबानी यांनी या बैठकीत सांगितले होते. राफेल विमान खरेदी करार होण्याच्या पंधरवडाभर आधी उद्योगपती अनिल अंबानी हे फ्रान्सचा संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना भेटले होते, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने प्रकाशित करून राफेल काराराबाबत नवा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Exit mobile version