Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना विषयक माहितीसाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाचे संकेतस्थळ

नंदुरबार प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता उपलब्ध खाटांची आणि त्यांच्या कोरोना अहवालाची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

https://ndbcovidinfo.com या संकेतस्थळावर खाजगी आणि सरकारी रुग्णालयातील रिकाम्या खाटांची माहिती उपलब्ध होणार आहे. तालुका निहाय आणि रुग्णालय निहाय ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याने नागरिकांना अधिक सोईचे होणार आहे. तालुक्याचे नाव किंवा रुग्णालयाचे नाव टाकून खाटांची उपलब्ध तपासण्याची शोध प्रणालीदेखील संकेतस्थळावर आहे.कोरोना चाचणी केल्यानंतर नागरिकांना आपला अहवाल कळावा यासाठी संकेतस्थळाचा उपयोग करता येणार आहे. आपला मोबाईल क्रमांक दिल्यास कोरोना चाचणीची तात्काळ माहिती मिळू शकेल. जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिकांची स्थिती (लोकेशन) आणि मोबाईल क्रमांकदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागरिकांना लसीकरण करणे सोईचे व्हावे यासाठी लसीकरण केंद्राची माहितीदेखील संकेतस्थळावर उपलब्ध असेल. शासन आणि प्रशासनाकडील कोविड-१९ संदर्भातील सर्व आदेश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व यंत्रणांमध्ये समन्वय स्थापण्यासाठी आणि नागरिकांना माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षदेखील स्थापन करण्यात आला असून ०२५६४-२१०१२३ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेता येणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या नागरिकांनी घरी न थांबता रुग्णालय अथवा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या अलगीकरण कक्षात उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

Exit mobile version