Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोघांमध्ये वादाची सुलझेना मिस्ट्री – राष्ट्रवादीने मांडली काँग्रेसची हिस्ट्री

भंडारा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसंस्था | नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर विश्वासघाताचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी प्रत्युत्तर देत काँग्रेसने भाजपासोबत केलेल्या युतीची हिस्ट्रीच मांडली आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमधील वादाची मिस्ट्री न सुलझता वाढण्याची चिन्हे दिसत आहे.

भंडारा-गोंदिया येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला वगळून भाजपासोबत युती केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रफुल पटेल यांच्यावर दगाबाजीचा गंभीर आरोप केला होता. याला राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी निवेदनाद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे. यात त्यांनी “भंडारा-गोंदियात काँग्रेसने भाजपासोबत केलेल्या युतीचा इतिहास  मांडला आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमधील वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहे.

याविषयी शिवाजीराव गर्जे यांनी, “भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीतील वस्तुस्थिती २०१० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १४ सदस्य निवडून आले, पण तेव्हाही काँग्रेस पक्षाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेबाहेर ठेवून भारतीय जनता पक्षासोबत सत्ता ग्रहण केली. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांचा कार्यकाळ हा अडीच वर्षाचा असतो यावेळी प्रथम काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपासोबत समझोता करून सत्ता ग्रहण केली.

दुसऱ्या अडीच वर्षाच्या टर्मला तत्कालीन काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भाजपाशी युती करून आपला विश्वासू चंद्रशेखर ठवरे यांना अध्यक्ष बनविले. तर २०१५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त २० सदस्य निवडून आले. काँग्रेस पक्षाचे १६ सदस्य निवडून आले होते, तरी काँग्रेस पक्षाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपासोबत समझोता करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेच्या बाहेर ठेवले,” असल्याचा आरोप करत पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरही गोंदियात भाजपा-काँग्रेस युती कायम होती. तर काँग्रेस पक्षाने तुमसर पंचायत समितीमध्ये भाजपासोबत युती केल्याचे शिवाजीराव गर्जे यांनी सांगितले.

Exit mobile version