Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माझा मुलगा व सून जामनेरचा विकास करत आहेत-ईश्‍वरबाबूजी जैन

जामनेर प्रतिनिधी । जामनेर शहरासह तालुक्यात प्रचंड गतीने कामे सुरू असून माझा मुलगा व सून हे विकास करत असल्याचे प्रतिपादन माजी खासदार ईश्‍वरबाबूजी जैन यांनी करून पुन्हा एकदा गिरीशभाऊंसोबतची सलगी जाहीर केली आहे.

जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन आणि कधी काळचे त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असणारे ईश्‍वरबाबूजी जैन यांच्यातील अलीकडच्या काळातील सलोखा कुणापासून लपून राहिलेला नाही. त्यांनी आधीच गिरीश महाजन हे आपले मानसपुत्र असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. नेमके याच प्रकारचे वक्तव्य त्यांनी जामनेर येथील एका हॉस्पीटलच्या उदघाटनाप्रसंगी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या कार्यक्रमात ईश्‍वरबाबूजी म्हणाले की, सर्वात जास्त प्रगतशील तालुका म्हणून जामनेरची ओळख झाली आहे. माझे गाव व तालुक्याचा विकास होत असेल तर मी का विरोध करावा ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. जो चांगले काम करतो त्याला करू द्या, संपूर्ण महाराष्ट्रात व्यवहार ठप्प असले तरी जामनेरात मालमत्तांचे भाव वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जामनेर शहर व तालुक्याचा विकास माझा मुलगा व सुनबाई करीत असून चांगले काम करणार्‍यांना सदैव आशीर्वाद असल्याचे माजी खासदार जैन यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यातून त्यांनी पुन्हा एकदा ना. गिरीश महाजन हे आपले मानसपुत्र असल्याचे स्पष्टपणे अधोरेखीत केले आहे. आगामी लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणूका तोंडावर असतांना बाबूजींचे हे बोल विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरवणारे ठरले आहे.

याच कार्यक्रमात त्यांनी आपण सक्रीय राजकारणातून बाजूला झाले असून मी पक्षात घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी असल्याचे वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेसलादेखील टोला मारला आहे. याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील, नगराध्यक्षा साधना महाजन, माजी आमदार दत्तात्रय महाजन, राजू बोहरा, रमेश पाटील, संत रामसिंहजी महाराज, रामेश्‍वर नाईक, चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष अनिस शेख, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांसमोर बाबूजींनी जाहीरपणे आपले ना. महाजन यांच्यावरील प्रेम दाखवून दिल्याने तालुक्यात खमंग चर्चा रंगली आहे.

Exit mobile version