Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविणार – मुख्यमंत्री

Uddhav ayodhya

 

मुंबई – कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक राज्यातील 2 कोटी 25 लाख कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी, लोकांना आरोग्य शिक्षण आणि महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, संशयित कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा या बाबींचा समावेश आहे. ही मोहीम पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान तर दुसऱ्या टप्प्यात 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत लोकप्रतिनिधींच्या सहभागातून व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात येणार आहे. आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी,पालक, सामान्य व्यक्तींसाठी निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत. विविध संस्थांसाठी ही बक्षीस योजना राबविण्यात येईल.

Exit mobile version