Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माझा कोरोना हा ईडीचा कोरोना नाही ! : आ. महाजन यांचा पलटवार (Video)

जळगाव राहूल शिरसाळे । कोरोना हा कुणालाही, अगदी तरूण व पैलवानांनाही होतो. याचा विचार करता आपला कोरोना हा खराखुरा असून एकनाथ खडसे यांच्यासारखा ईडीचा कोरोना नसल्याचा पलटवार आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला आहे. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांना मध्यंतरी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांच्यावर मुंबई येथील शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर ते घरी परतले आहेत. आज त्यांनी जळगावच्या जीएम फाऊंडेशन या आपल्या कार्यालयात येऊन आधीप्रमाणे कामकाज सुरू केली.

आमदार गिरीश महाजन यांनी पहिल्यांदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी कॉलेजतर्फे कोविडच्या प्रतिकारासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, माजी महापौर भारती सोनवणे, आरोग्यदूत अरविंद देशमुख, नगरसेवक कैलास सोनवणे आदींची उपस्थिती होती.

आमदार महाजन यांनी प्रथम अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यासोबत आरोग्यविषयक सुविधांबाबत चर्चा केली. तर काही वेळातच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे देखील तेथे दाखल झाले. यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाच्या प्रतिकारासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

यानंतर पत्रकारांशी बोलतांना आ. गिरीश महाजन यांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, सर्वत्र कोरोनाची रूग्णसंख्या वाढीस लागली असतांना जळगाव जिल्ह्यात स्थिती अतिशय गंभीर बनली आहे. जिल्ह्यात बेडची कमतरता असून याचे व्यवस्थापन देखील बरोबर करण्यात आलेले नाही. तसेच अगदी दहा-दहा दिवसांपर्यंत कोरोनाचे रिपोर्ट मिळत नाहीत. अनेक ठिकाणी रेमडेसीवीर इंजेक्शन हे अतिशय चढ्या दराने विकले जात आहे. तर बर्‍याच खासगी रूग्णालयांमध्ये अव्वाच्या सव्वा बिले आकारण्यात येत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर्स व अन्य कर्मचार्‍यांची संख्या देखील पुरेशी नसल्याचे ते म्हणाले. तर कर्मचार्‍यांचे मानधन देखील थकलेले असून नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असल्याचा आरोप आ. महाजन यांनी केला. 

याप्रसंगी आमदार गिरीश महाजन यांनी आ. मंगेश चव्हाण यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठींबा व्यक्त करून राज्य सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले असल्याचा आरोप केला. याप्रसंगी एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या सारख्या युवा नेत्याला कोरोना कसा झाला ? या वक्तव्याची आठवण करून दिली. यावर आमदार महाजन म्हणाले की, माझा कोरोना हा खराखुरा असून ईडीचा कोरोना नाही. कोरोना हा सर्वांनाच, अगदी तरूण व पैलवानांनाही होतो. माझ्यासह माझ्या कुटुंबाला कोरोना झाला होता. आम्ही सर्व जण दहा दिवस सरकारी रूग्णालयात अ‍ॅडमीट झालो होतो. मात्र माझा कोरोना हा ईडीची तारीख आली म्हणून झालेला कोरोना नाही. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना ईडीची तारीख आल्यावर कोरोना होतो. व ते नंतर बाहेर फिरत असतात अशा शब्दांमध्ये आ. गिरीश महाजन यांनी टीका केली.

तसेच त्यांनी याप्रसंगी खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी आ. महाजन यांनी जिल्ह्यात कोरोनाच्या स्थितीसाठी सत्ताधारी कारणीभूत असल्याचा आरोप केला.

माजी मंत्री आ. गिरीष महाजन नेमके काय म्हणाले ?

 

Exit mobile version