अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कूच करीत निघालेले मराठे आज (रविवारी) रात्री बाराबाभळीतील मदरशात डेरेदाखल होणार आहेत. तेथे सर्व आंदोलकांची मुस्लिम समाजातर्फे मेहमान नवाजी केली जाणार आहे.
तेथील विद्यार्थीही आंदोलकांची खातीरदारी करणार आहेत. रात्री नऊच्या सुमारास जरांगे यांची सभा होणार आहे. त्यासाठी दीडशे एकर मैदान तयार आहे. नियोजनासाठी सुमारे तीन हजार स्वयंसेवकांसह दीड हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून पायी मुंबईकडे निघाले आहेत. लाखो मराठा आंदोलक या मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा पाथर्डी मार्गे रविवारी सायंकाळी बाराबाभळी येथे येणार आहे.
या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलकांच्या मुक्कामाची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. फूड पॅकेट, पाण्याच्या बाटल्या, फिरते रुग्णालय, शौचालय, पिण्याच्या पाण्याचे टँकर यासारखी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. मुक्कामाच्या ठिकाणी पुलाव आणि शिरा तयार केला जाणार आहे. एकही आंदोलक उपाशी राहणार नाही, याची दक्षता सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात येत आहे.
आंदोलकांच्या सेवेसाठी तीन हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाराबाबळी येथील मदरशामधील ३५० विद्यार्थ्यांचा या स्वयंसेवकांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयांचे विद्यार्थी देखील स्वयंसेवक म्हणून काम पाहणार आहेत. रात्री नऊच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. नगर-पाथर्डी मार्गावर पाच किलोमीटर अंतरावर हा बंदोबस्त तैनात राहणार आहे. सोमवारी सकाळी आंदोलक नगर-पुणे मार्गे मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत
मुस्लिम समाजाने बाराबाभळीतील मदरसा मराठा आंदोलकांसाठी खुला करून दिला आहे. त्यांच्या सेवेसाठी मदरशातील साडेतीनशे विद्यार्थीही सज्ज आहेत. या मदरसा परिसरात भगवे झेंडे लावण्यासही परवानगी देण्यात आल्याचे मदरशाचे विश्वस्त मतीन सय्यद यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चातही मुस्लिम समाजाच्या वतीने पाणी व शरबत वाटप करण्यात आले होते. आरक्षणावरून काही नेत्यांच्या प्रक्षोभक विधानांमुळे दोन जातीत तेढ वाढत आहे. मात्र, मुस्लिम समाजाच्या या मदरशामुळे नक्कीच सामाजिक सलोखा राखण्यास मदत होणार आहे. सोशल मीडियातही त्यांच्या या कृतीची वाहवा होत आहे.