Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात संगीत संध्या जल्लोषात

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील जूनियर चेंबर ऑफ इंडिया (जेसिस) शाखा पाचोरा आणि रोटरी क्लब ऑफ पाचोरा – भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “होली मिलन” निमित्त संगीत संध्याचे आयोजन करण्यात आला होते.

पाचोरा येथील बनोटीवाला फार्म हाऊसच्या हिरवळीवर झालेल्या या कार्यक्रमात रंगांची उधळण आणि संगीत सुरांची मैफिल विस्मरणीय ठरली. जे. सी. आय. व रोटरी क्लब च्या संयुक्त विद्यमाने “द म्युझिक्रॅट्स युनायटेड ग्रुप” (मुंबई) च्या संगीत सुरांनी होली मिलन संध्येला रंगत आणली. संध्येची सुरुवात श्री. गणेश वंदनाने करण्यात आली. या संगीत संध्येत लोकप्रिय हिंदी, मराठी चित्रपटातील तसेच चिरतरुण अल्बम गीते सादर करण्यात आली. रोटरी क्लबचे उपप्रांतपाल रो. राजेश मोर यांच्या संकल्पनेतून ही संगीत संध्या घेण्यात आली.

“द म्युझिक्रॅट युनायटेड ग्रुप” मधील मुख्य गायक शुभम साबळे, पर्कशन वाद्य वादक प्रितम गच्‍चे, आणि गिटारिस्ट तथा गायक अथर्व कानेटकर यांनी उपस्थितांची मने जिंकली. या संगीत संध्येस जय किरण प्रभाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी नृत्याविष्कार सादर करून प्रदीर्घ कार्यक्रमाची गोडी वाढवली. अश्विनी जळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी जळतकर हिने सोलो नृत्य आणि विद्यार्थिनींच्या दोन समूह नृत्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. या समूह नृत्यामध्ये सारिका पाटील, तनिष्का पाटील, भावीका, सायली, समृद्धी, सुप्रिया, निकिता, आकांक्षा व वैष्णवी इत्यादी विद्यार्थिनींनी भाग घेतला. कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला स्वागत कमानी जवळच रंग लावून व त्यांच्यावर रंगाची उधळण करून स्वागत केले जात होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रो. डॉ. बाळकृष्ण पाटील व जे. सी. रोहित रिझानी यांनी प्रास्ताविक सादर केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपप्रांतपाल राजेश मोर यांचा जे. सी. जीवन जैन यांनी तर जेसिस चे झोन उपाध्यक्ष जे. सी. मयुर दायमा यांचा रो. डॉ. अमोल जाधव यांनी सत्कार केला. बनोटीवाला परिवाराचे ज्येष्ठ सदस्य कांतीलाल जैन यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. रो. डॉ. पंकज शिंदे आणि जे. सी. पियुष अग्रवाल यांनी आभार मानले. रो. प्रा. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला रोटरी व जेसिस क्लबचे सर्व पदाधिकारी सदस्य सहपरिवार उपस्थित होते. रो. निलेश कोटेचा, ज्युनियर जे. सी. मीतेश जैन व त्यांच्या सर्व तरुण सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Exit mobile version