जुलैमध्ये जाहीर होणार महापालिका-नगरपालिकांच्या निवडणुका ?

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य निवडणूक आयोग ७ जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करणार असून यानंतर पहिल्या टप्प्यात राज्यातील महापालिका आणि निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता आहे.

 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या केव्हा होणार याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमिवर, एबीपी-माझा या वृत्तवाहिनीने जुलै ते ऑक्टोबरच्या दरम्यान, पहिल्या टप्प्यातील निवडणुका जाहीर होणार असल्याचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार आगामी निवडणुकांसाठी ३१ मे २०२२ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. ही यादी आणि यावरील हरकतीनंतर ७ जुलै रोजी अंतीम मतदार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यानंतर कोणत्याही क्षणाला निवडणुकांची घोषणा होऊ शकते असे या वृत्तात म्हटले आहे.

 

नऊ महिन्यांपूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून राज्य निवडणूक आयोगानं (डएउ) पहिल्यांदाच संभाव्य तारखांबाबत संकेत दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुकांसाठी ३१ मेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार असल्याचं निश्चित केलं आहे. याचाच अर्थ या तारखेला किंवा त्यापूर्वी नोंदणी केलेल्या मतदारांना या मतदानात मतदान करण्याचा अधिकार असणार आहे.  या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या आयुक्तांना पत्र पाठविले आहे.

 

१४ नागरी संस्थांच्या महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात, राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं आहे की, स्थानिक-स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तीन टप्पे आहेत. प्रभाग आणि आरक्षण सोडत, निवडणूक आयोगानं तयार केलेली विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी जाहीर करणं आणि तिसरी पायरी म्हणजे निवडणूक. या पत्रात पुढे निवडणूक आयोगानं नमूद केलंय की, १४ महापालिकांची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे. तसेच, या निवडणुकीसाठीची मतदार यादी ७ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल, असंही निवडणूक आयोगानं या पत्रात नमूद केलं आहे. यानंतर निवडणुका जाहीर होणार असल्याचे एबीपी-माझाच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

 

यामुळे जळगाव जिल्ह्यातील १४ नगरपालिकांच्या निवडणुका देखील याच टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

Protected Content