Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावकरांच्या दणक्याने मुनव्वर राणा हादरले; घेतला ‘यू टर्न’ !

जळगाव प्रतिनिधी | महर्षी वाल्मीक यांच्याबाबतच्या अपशब्दामुळे जळगावमध्ये गुन्हा दाखल होताच प्रसिध्द शायर मुनव्वर राणा यांनी आपल्या वक्तव्यावरून ‘यू टर्न’ घेत आपण असे वक्तव्य केले नसून याला गांभिर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

याबाबत वृत्त असे की, प्रसिद्ध ऊर्दू शायर मुनव्वर राणा यांनी तालिबानचं समर्थन करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तालिबाननं योग्य केलं. आपल्या जमिनीवर कशाही प्रकारे कब्जा केला जाऊ शकतो, असं विधान राणा यांनी केलं. तालिबान दशतवादी संघटना असू शकते, परंतु जर ते आपल्या देशासाठी लढत आहेत, तर तुम्ही त्यांना दहशतवादी कसं म्हणू शकता, असंही राणा यांनी म्हटलं होतं. महर्षि वाल्मिकी यांची तुलनाही त्यांनी तालिबानशी केली होती.  यामुळे त्यांच्या विरोधात देशभर तीव्र संतापाची लाट उसळली होती.

मुनव्वर राणा यांच्या वक्तव्याचा निषेध करत जळगावमध्ये त्यांच्या विरूध्द शनिपेठ पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील करण्यात आले होते. यानंतर लखनौमध्येही एफआयआर दाखल झाला आहे. आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच राणा यांनी आपल्या वक्तव्यावरुन यु टर्न घेतला आहे.

आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना मुनव्वर राणा यांनी आपल्या भूमिकेवरून घुमजाव केल्याचे दिसून आले. यात त्यांनी आपल्या आधीच्या वक्तव्याला गांभिर्याने घेऊ नये असे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माझं प्रेम आहे, असे राणा यांनी म्हटलंय. तसेच, तालिबान्यांपेक्षा जास्त हत्यारं भारतातील गुंड-माफियांकडे आहेत, या मी केलेल्या विधानाला गंभीरतेनं घेण्याच गरज नाही, असेही त्यांनी सांगितलं आहे. मात्र आता कोळी समाजबांधवांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असल्याने मुनव्वर राणा यांनी घुमजाव केले तरी त्यांचा क्षोभ शांत होणार का ? याकडे लक्ष लागून आहे.

Exit mobile version