Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नव्या आयुक्तांना हिंमतीने व सावधगिरीने काम करावे लागेल : शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । परमबीरसिंग यांच्यावर एका विशिष्ट लॉबीचा राग असून त्यांच्या हाती जिलेटीनच्या २० कांड्या लागल्या. या न फुटताच अनेकांना हादरे बसल्याचे नमूद करत नवीन आयुक्त हेमंत नगराळे यांना हिंमतीने आणि सावधगिरीने काम करावे लागेल असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामध्ये पोलीस आयुक्तांच्या बदलीवर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात सापडलेली संशयास्पद गाडी व त्यानंतर गाडीमालक मनसुख हिरेन याचा संशयास्पदरीत्या आढळलेला मृतदेह हा प्रकार नक्कीच चिंताजनक आहे. विरोधी पक्षाने या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले हे खरे, पण राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असतानाच ‘एनआयए’ने घाईगडबडीत तपासाची सूत्रे हाती घेतली. महाराष्ट्र सरकारला कुठे बदनाम करता आले तर पाहावे यापेक्षा वेगळा ‘उदात्त’ हेतू त्यामागे नसावा.

यात पुढे म्हटले आहे की, या जिलेटिनच्या कांडय़ांचा तपास करणाऱया ‘एनआयए’ने उरी हल्ला, पठाणकोट हल्ला व पुलवामा हल्ल्यात काय तपास केला, कोणते सत्यशोधन केले, किती गुन्हेगारांना अटक केली हेसुद्धा रहस्यच आहे. पण मुंबईतील वीस जिलेटिन कांडय़ा हा ‘एनआयए’साठी मोठाच आव्हानाचा विषय ठरताना दिसत आहे.

यात पुढे म्हटले आहे की, मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असे नाही. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे त्यांनी अत्यंत कठीण काळात हाती घेतली. कोरोना संकटाशी लढण्यासाठी त्यांनी पोलिसांत जोश निर्माण केला. धारावीसारख्या भागात ते स्वतः जात राहिले. सुशांत, कंगनासारख्या प्रकरणी त्यांनी पोलिसांचे धैर्य ढळू दिले नाही. त्यामुळे पुढे या प्रकरणात सीबीआय आली तरी मुंबई पोलिसांच्या तपासापुढे सीबीआयला जाता आले नाही. टीआरपी घोटाळय़ाची फाईल त्यांच्याच काळात उघडली. परमबीर सिंग यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग होता तो याच कारणांमुळे. त्यांच्या हाती जिलेटिनच्या 20 कांडय़ा सापडल्या. त्या कांडय़ांचा स्फोट न होताच पोलीस दलास हादरे बसले. नवे आयुक्त हेमंत नगराळे यांना हिमतीने व सावधगिरीने काम करावे लागेल.

Exit mobile version