Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : नगरपालिका व महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग रचना कायम राहणार !

मुंबई प्रतिनिधी | आगामी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे राज्य सरकारने आधी हा निर्णय रद्द करण्याच्या निर्णयावरून घुमजाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, गत पंचवार्षिकमध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला होता. तर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला. राज्य शासनाने या संदर्भात ३१ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २०१९ अन्वये सर्व महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली होती. अलीकडेच याबाबतचा शासन निर्णय देखील जाहीर झाला होता.

मात्र न्यायालयाने कोरोनाचे कारण देऊन निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिल्याने निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या निवडणुका वेळेत घ्यावयाच्या असल्यास नवीन पध्दतीत प्रभाग रचनेसाठी वेळ लागेल. यामुळे ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने आधीप्रमाणेच बहुसदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. याच्या अंतर्गत महापालिकेत तीन तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्यीय प्रभाग पध्दती असणार आहे. तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल.

जळगाव जिल्ह्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांमध्येही आता दोन सदस्यीय प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version