Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘एक दुजे के लिये’ म्हणत त्याचा टोकाचा निर्णय : अधुरी प्रेम कहाणी !

मुक्ताईनगर-पंकज कपले | एकमेकांशी जगण्याच्या आणा-भाका घेतलेल्या तालुक्यातील प्रेमी युगलाने अतिशय टोकाचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील चांगदेव येथील तरूणाचा मृत्यू झाला असून यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

अनेकदा प्रेमी युगल हे टोकाचे पाऊल उचलून आत्मघाताचा मार्ग पत्करतात. असलाच भयंकर प्रकार काल घडला असून यातील तरूण हा चांगदेवचा तर मुलगी ही कुंड येथील आहे. चांगदेव येथील उमेश मोहन तारू ( वय २३ ) या तरूणाचे तालुक्यातील कुंड येथील तरूणीशी प्रेम होते. मात्र त्या तरूणाच्या कुटुंबियांनी तिचा विवाह दुसरीकडे लाऊन दिला होता. तिकडे तिला त्रास सुरू झाल्यामुळे तिने याबाबत उमेश याला माहिती दिली.

यामुळे उमेश याने त्या तरूणीला ठाण्यावरून पुण्याला नेले. तेथून ते छत्रपती संभाजी नगर मार्गे घरी येण्यासाठी निघाले. तथापि, आपला विवाह होणार नाही असे स्पष्ट होताच उमेश आणि त्याच्या प्रेयसीने धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून दिले. यात उमेशचा मृत्यू झाला असून तरूणी गंभीर जखमी झाली आहे.

दरम्यान, उमेश याने आत्मघात करण्याआधीच आपल्या मित्रांना याबाबतची माहिती मोबाईलवरून दिल्याने ते हादरले होते. यानंतर काही वेळाने त्यांच्यासह आप्तांना ही माहिती मिळताच ते शोकसागरात बुडून गेले. या घटनेमुळे चांगदेव गावावर शोककळा पसरली असून उमेशबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कुणाच्या अध्यात-मध्यात नसणार्‍या या तरूणाने नेमके टोकाचे पाऊल उचलले कसे ? याबाबत परिसरात चर्चा सुरू करत संवेदना व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version