Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षांची करणार तक्रार- शिवसेनेची आक्रमक भूमिका

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शहराच्या विकासाला खीळ बसल्याचा आरोप करत या प्रकरणी नगराध्यक्षांची नगरविकास मंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती शिवसेनेतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मुक्ताईनगर शहरातील विकासकामांचा मुद्दा आता ऐरणीवर आला असून याबाबत शिवसेनेतर्फे पत्रकार परिषदेत सत्ताधार्‍यांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. शासनाच्या परिपत्रकाचा नगराध्यक्षांनी अपमान केला आहे. त्याविरोधात जिल्हाधिकारी व नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिली.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी शहरातील सर्व १७ प्रभागांसाठी साडेचार कोटी रूपयांची विकास कामे मंजूर करून आणली आहेत. मात्र, संकुचित वृत्तीने या विकासकामांचा विषय अजेंड्यावर न घेता नगरसेवकांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. यामुळेच नगराध्यक्षांची तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. यासोबत साडेचार कोटी रुपयांच्या कामांसाठी नाहरकत नगरपंचायतीने न दिल्यास सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम काम करण्यासंदर्भात आमदारांना साकडे घालणार असल्याचेही नगरसेवकांनी सांगितले. यापुर्वीही दीड कोटी रुपयांची विकासकामे आमदार पाटील यांनी मंजूर करून आणली आहेत. या कामांना नगरपंचायतीने नाहरकत दिली होती. मात्र साडेचार कोटींच्या कामांना परवानगी न देण्यामागे कारण काय? असा सवाल देखील याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, गटनेते राजेंद्र हिवराळे, उपगटनेते संतोष मराठे ,नगरसेविका सविता भलभले, संतोष माळी आदी उपस्थित होते.

Exit mobile version