Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार-खासदारांच्या मुक्ताईनगरात गटारी साफ करायला कुणी येईना !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात अगदी नावाजलेले राजकारणी वास्तव्याला असतांनाही प्रभाग क्रमांक १३ मध्ये गटारी साफ करण्यासाठी कुणी येत नसल्याने येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत.

मुक्ताईनगर शहरात सध्या नागरी सुविधांची अतिशय दैनावस्था झालेली आहे. यात प्रभाग क्रमांक-१३ मध्ये तर असुविधांचा अक्षरश: कळस आहे. सर्वात घाण प्रभाग म्हणून काही पारितोषीक ठेवले तर याच प्रभागाला मिळेल अशी स्थिती आहे. मात्र प्रशासन इतके निर्लज्ज आहे की, ते इकडे फिरकूनही पाहत नाही.

या प्रभागात सुमारे २० ते २२ वर्षांपासून नागरी वस्ती असली तरी तेथे कोणत्याही सुविधा नाहीत. या भागातील नागरिकांनी स्वत: गटारी काढल्या असल्या तरी त्या स्वच्छ करण्यासाठी देखील कुणी येत नाही. यामुळे येथील नागरिकांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मुक्ताईनगर शहर हे हेवीवेट राजकारण्यांचे माहेरघर मानले जाते. चंद्रकांत पाटील आणि एकनाथराव खडसे यांच्यासारखे दोन आमदार आणि रक्षाताई खडसे यांच्यासारख्या खासदार असतांनाही जर आमच्या गटारी काढल्या जात नसतील तर आम्ही कुणाकडे जावे ? असा प्रश्‍न येथील नागरिकांनी विचारला आहे. आमदार आणि खासदार हे काम नगरपंचायतीचे असल्याचे सांगत पळ काढतील. तथापि, नगरपंचायत चालविणारे तुमचेच समर्थक असल्याने त्यांना हे काम सांगता येणार नाही का ? असा प्रश्‍न देखील येथील नागरिकांनी विचारला आहे.

Exit mobile version