Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञात जमावाचा हल्ला

मुक्ताईनगर प्रतिनिधी | जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून पलायन केल्याची घटना आज रात्री घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुक्ताईनगर मतदारसंघात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष पेटला आहे. आधी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याशी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि गैरवर्तणुक केल्याने या वादाची ठिणगी पडली. यातून राष्ट्रवादीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. तर शिवसेना पदाधिकार्‍यांनीही निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यानंतर मुक्ताईनगरात फेसबुकवरील कॉमेंटच्या माध्यमातून झालेल्या वादात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेत. यातच रोहिणी खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटलांना चोपण्याची भाषा केल्याने वादात तेल ओतले गेले. यानंतर दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काल तर रोहिणी खडसे यांच्या विरोधात आंदोलन देखील झालीत. यातच आज खुद्द आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.

या पार्श्‍वभूमिवर, आज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रोहिणी खडसे या मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असतांना एमएच १९ सीसी-१९१९ या क्रमांकाच्या त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. याप्रसंगी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा ड्रायव्हर होता. यात कोयत्याच्या मदतीने त्यांच्या गाडीच्या काचांवर आघात करण्यात आले. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना काही दुखापत झाली नाही. मात्र हल्लेखोर काही क्षणात फरार झाले. हे हल्लेखोर पाच जण असून त्यांच्याकडे लोखंडी रॉडसह शस्त्रे असल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version