Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : मुक्ताईनगरात शिवसैनिकांची धरपकड; पोलिसांनी घेतले ताब्यात !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा प्रशासनाने महाप्रबोधन यात्रेला परवानगी नाकारूनही सभागृहात सभा घेण्याची तयारी करणार्‍या शिवसैनिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

काल रात्री उशीरा मुक्ताईनगरातील महाप्रबोधन यात्रा आणि महाआरती या दोन्ही कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली. यानंतर आज सकाळपासूनच शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाप्रबोधन सभेच्या ठिकाणीच ठाण मांडले. काहीही झाले तरी सभा होणारच असल्याचा त्यांचा पवित्रा होता. तथापि, दुपारी सभेसाठी लागलेले व्यासपीठ आणि अन्य बाबी हटविण्यात आल्या. यानंतर संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील, जिल्हा संघटक गजानन मालपुरे आदी पदाधिकार्‍यांनी मुक्ताईनगर गाठले. त्यांनी युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे आणि त्यांच्या सहकार्‍यांसह वार्तालाप केला. यानंतर शहरातील गोदावरी मंगल कार्यालयातील हॉलमध्ये सभा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तथापि, पोलिसांनी याला देखील परवानगी नाकारली.

याप्रसंगी शिवसैनिक आणि पोलीस प्रशासनामध्ये शाब्दीक वाद देखील झाले. अखेर पाच वाजेच्या सुमारास पोलीस प्रशासनाने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात नेले. याप्रसंगी जोरदा घोषणाबाजी करण्यात आली.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या सर्वांना पोलीस स्थानकात नेऊन त्यांची चौकशी सुरू होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पदाधिकार्‍यांमध्ये पक्षाचे संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हा संघटन गजानन मालपुरे, जिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील, दीपकसिंग राजपूत व समाधान महाजन, ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर खैरनार, युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे आदींचा समावेश होता.

Exit mobile version