Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीक विम्यासाठी ई-पीक पाहणीची अट रद्द : आ. पाटील यांच्या मागणीला यश

मुक्ताईनगर/सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फळपीक विमा योजनेची माहिती अपलोड करण्यासाठी ई-पीक पाहणीची अट रद्द करून मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली असून जिल्हाधिकार्‍यांनी ई-पीक पाहणीची अट रद्द केली आहे.

 

या संदर्भातील माहिती अशी की, यंदा पीक विमा काढण्यासाठीची अंतिम मुदत ही ३१ ऑक्टोबरपर्यंत आहे. यासाठी माहिती अपलोड करतांना ई-पीक पाहणी अनिवार्य करण्यात आली होती. यामुळे अनेक शेतकर्‍यांना अडचणी येत होत्या. यात इंटरनेटचा संथ वेग, सर्व्हरची समस्या आदी बाबींमुळे अडचणीत वाढ झाली होती. नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी केली होती.

आमदार पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी आज पीक विम्यासाठी ई-पीक पाहणी अनिवार्य नसल्याचे पत्र जारी केले आहे. हे पत्र निवासी जिल्हाधिकार्‍यांनी सर्व तहसीलदार आणि कृषी अधिकार्‍यांना पाठविले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अर्थात, यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.

 

Exit mobile version