Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजय जैन यांच्या नियुक्तीला काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचा विरोध

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील अजय जैन यांची जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी झालेली निवड वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. पक्षाचे सदस्य देखील नसणार्‍या जैन यांना पद कसे मिळाले असा प्रश्‍न स्थानिक पदाधिकार्‍यांनी उपस्थित करून याला वाचा फोडली आहे.

काँग्रेस प्रदेश सरचिटणीसांनी जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी मुक्ताईनगर येथील अजय जैन यांची नियुक्ती केल्याने स्थानिक पदाधिकार्‍यांना धक्का बसला आहे. या अनुषंगाने पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली.

याप्रसंगी सांगण्यात आले की, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी यांनी १९ नोव्हेंबरच्या पत्रानुसार मुक्ताईनगर येथील अजय जैन यांनी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मात्र, ही नियुक्ती नियमाला अनुसरून नाही. जैन हे पक्षाचे प्राथमिक सदस्य देखील नसताना थेट जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. जिल्हा कार्यकारिणी निवडीचे अधिकार केवळ जिल्हाध्यक्षांना असतात. जैन यांची नियुक्ती या पदाधिकार्‍यांना विश्‍वासात न घेता करण्यात आली. त्यामुळे ही नियुक्ती अनधिकृत आहे, अशी भूमिका पदाधिकार्‍यांनी घेतली. या पत्रकार परिषदेला तालुका अध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, जिल्हा सचिव आसिफ खान आदी उपस्थित होते.

तर दुसरीकडे अजय जैन यांनी आपण आधीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचा दावा करत नियुक्ती अधिकृत असल्याचे सांगितले आहे.

Exit mobile version