Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात ठाकरे-शिंदे गटात ठिणगी : तिघांविरूध्द गुन्हा दाखल

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे राज्यात उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहचला असतांना मुक्ताईनगरात या दोन्ही गटांमध्ये ठिणगी पडली असून यातून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थक नगरसेवकासह तिघांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगरात काल रात्री उशीरा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍याच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या संदर्भात भाग्यश्री अजय जैन यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यात नमूद केले आहे की, काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्या आपल्या कुटुंबियांसह देवी विसर्जन मिरवणूक पहात होत्या. याप्रसंगी नगरसेवक राजू हिवराळे व त्यांच्या सहकार्‍यांनी जुन्या वादातून त्यांचे पती अजय जैन यांच्याशी हुज्जत घातली. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला.

यानंतर काल रात्री सव्वाबाराच्या सुमारास राजू हिवराळे आणि इतरांनी अजय जैन यांच्या घराजवळ येऊन त्यांना शिवीगाळ केली. त्यांनी दगडफेक करण्यास प्रारंभ केला. यामुळे अजय जैन यांनी स्वरक्षणार्थ कुंडी फेकल्यानंतर त्यांनी पुन्हा जोराने दगडफेक केली. यामुळे जैन दाम्पत्य घरात गेले. त्यांनी रोहिणी खडसे यांना फोन लाऊन माहिती दिली. थोड्या वेळाने पोलीस आल्यानंतर हे लोक निघून गेले. दरम्यान, या दगडफेकीत अजय जैन यांच्या घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या संदर्भात भाग्यश्री अजय जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नगरसेवक राजेंद्र सुकदेव हिवराळे उफॅ राजू डॉन; बाळा सुभाष चिंचोले व विकास जुमळे या तिघांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात भादंवि कलम १४३, १४७, ४२७, ५०४, ३७ (१); ३७ (३); १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. यातील विकास जुमळे हे होमगार्ड म्हणून कार्यरत आहेत.

राज्यभरात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड खुन्नस सुरू आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांना नवीन नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर संघर्षाचा पहिला फटाका हा मुक्ताईनगरात फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यांच्या घरावर हल्ला झाला ते अजय जैन हे आधी कॉंग्रेसचे पदाधिकारी होते. नंतर अलीकडेच ते उध्दव ठाकरे यांच्या गटात दाखल झाले होते. त्यांच्या घरावर आमदार चंद्रकांत पाटील समर्थक राजेंद्र सुखदेव हिवराळे उर्फ राजू डॉन यांच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने वादाची पहिली ठिणगी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version