Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुर्‍हाडीच्या घावाने तरूणाचा खून; मेहुण्याने शालकाची केली हत्या !

मुक्ताईनगर प्रतिनिधी | एका इसमाने आपल्या सासुरवाडीला जाऊन शालकाच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील भुसावळ रोडवर कोर्टाजवळ विशाल वामन ठोसरे हा युवक राहतो. त्याच्या बहिणीचे सुमारे चार वर्षांपूर्वी चुंचाळे (ता. यावल) येथील विजय सावकारे याच्याशी लग्न झाले होते. मात्र यानंतर त्यांचे कौटुंबिक वाद झाले होते. तथापि, अलीकडे सलोखा होऊन त्याची बहिण सासरी नांदत होती.

काल रात्री विजय सावकारे हा सासूरवाडीला आला. येथे त्याने गोंधळ घातला. मात्र हा वाद मिटल्यानंतर विशाल ठोसरे हे आपल्या कुटुंबियांसोबत झोपले होते. दरम्यान, आज पहाट विशाल ठोसरे यांच्या आईला जाग आली असता त्यांना आपल्या मुलाच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घातले असून यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसले. त्यांनी घरातील इतर मंडळीला उठविले. विशाल ठोसरे यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. तर, विजय सावकारे हे घरात आढळून न आल्याने त्यांनीच हा खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. शेवटचे वृत्त आले तोवर या प्रकरणी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Exit mobile version