Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेला संपविण्याची वल्गना करणार्‍यांचे जनतेने गर्वहरण केले : आ. चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर प्रतिनिधी | तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्वांनी पुन्हा सक्रीय होण्याची साद घातली. शिवसेनेला संपविण्याची वल्गना करणार्‍यांचे जनतेने गर्वहरण केल्याची टीका देखील त्यांनी याप्रसंगी बोलतांना केली.

मुक्ताईनगर शहरातील जुन्या काळात अतिशय खस्ता खाऊन शिवसेनेची ज्योत कायम तेवत ठेवणार्‍या जेष्ठ शिवसैनिकांची महत्वपूर्ण बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शिवनेरी या निवासस्थानी काल रात्री ८ वाजेच्या सुमारास मोठ्या उत्साहात पार पडला.बैठकीत जुन्या व जेष्ठ शिवसैनिकांच्या अडीअडचणी व समस्यांसंदर्भात चर्चा झाली. तसेच आता मागे न थांबता शिवसैनिक व युवा सैनिकांच्या पाठीवर अनुभवाचा हात ठेवून घर तिथे शिवसैनिक राबविण्याची वज्रमुठ आवळण्यात आली.तसेच त्यांच्याकडून शहराच्या विकासासाठी चर्चेतून बहुमूल्य मार्गदर्शन घेतले.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोलतांना सांगितले की त्या काळात शिवसेनेला वेगळे पडण्याचा प्रयत्न, किंवा शिवसेना ही बंडखोर संघटना आहे,घरातून , कुटुंबातून , पोलिसांकडून आणि इतर प्रस्थापित पक्षांकडून शिवसेना त्या काळात कशी संपेल असा सगळा प्रयत्न झाला. त्यातच शिवसेनेचा एकही सरपंच, जि. प व पं स सदस्य किंवा आमदार नाही की खासदार नाही असे असताना शिवसेना जिवंत ठेवली ती केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार ,शुभेच्छा किंवा आशीर्वाद यामुळेच…! अशा स्थितीत ज्या लोकांनी शिवसेना उभी केली. खर्‍या अर्थाने त्या लोकांना आज अतिशय नम्रपणे एकत्रित बोलवून त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करण्याचा हितगुज करण्याचा विचार मनात आला म्हणून आज ही बैठक घेतल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत जेष्ठ शिवसैनिक हिरा शेठ राणे, रमेश सापधरे, शांताराम कपले, सुरेश कपले यांची आवर्जून आठवण काढून त्यांच्या कार्याला व आठवणींना उजाळा दिला. अशा ज्या लोकांनी शिवसेना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उभी केली वाढविली खस्ता खाल्ल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पाहिले नसल्यावरही केवळ एकलव्या प्रमाणे एक नेता एक गुरू हे ब्रीद ठेवून काम केले अशा तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा असे म्हणत त्यांनी किमान आठ दिवसातून एकदा तरी शिवसेना कार्यालयात येऊन युवा शिवसैनिकांना तुमचे मार्गदर्शन करावे अनुभवाचा मायेचा हात प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठीवर ठेवावा तसेच येत्या पुढील काळात घर तेथे शिवसेना व शिवसैनिक हा उद्देश साध्य करण्यासाठी सोबत राहावे असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्व जेष्ठ शिवसैनिकांना केले. या बैठकीला ज्येष्ठ शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

या प्रसंगी व्यासपीठावर माजी तालुका प्रमुख प्रमोद देशमुख,तालुका प्रमुख छोटू भोई ,प्रफुल्ल पाटील, गोपाळ सोनवणे, शहर प्रमुख राजेंद्र हिवराळे,प्रशांत टोंगे,सर्व नगरसेवक व शिवसेना व युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version