मुक्ताईनगरात साकारणार प्रतापसिंह बोदडे यांचे स्मारक : आठवले

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ख्यातनाम भीमशाहीर कालकथित प्रतापसिंह बोदडे यांचे मुक्ताईनगरात भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. ते बोदडे यांना अभिवादन करण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

मुक्ताईनगरचे थोर सुपुत्र प्रख्यात भीमशाहीर प्रतापसिंह बोदडे हे नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी येथील प्रवर्तन चौकात रविवारी रात्री अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे उपस्थिथ होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रामदास आठवले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. नंतर दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर उपस्थित कवी, गायक कलावंतांनी दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांना आपल्या गीतांतून श्रद्धांजली अर्पण केली. तर रामदास आठवले यांनी आपल्या भाषणातून बोदडे यांच्या महान कार्याचे स्मरण करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, या अतिशय महान कलावंताचे मुक्ताईनगर येथे भव्य स्मारक साकारण्यात येणार असून यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव, भुसावळचे माजी नगरसेवक रवी सपकाळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर रामदासी आठवले यांनी बोदडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन शासनातर्फे त्यांना पाच लाखांचा निधी देण्याचे घोषित केले.

Protected Content