Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. विवेक सोनवणे यांच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांना मिळाली भरपाई

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वन्य प्राण्यांमुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली आहे.

मुक्ताईनगर सह जिल्ह्यात वन्य प्राण्यांमुळे शेतकर्‍यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मागील एक वर्षापासून मिळाली नसल्यामुळे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे नुकसान भरपाई तात्काळ मिळण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मुक्ताईनगर सह जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानीचे धनादेश वनविभागाकडून प्राप्त झाले आहेत.

प्रत्येक शेतकरी हा आपले पीक रात्रंदिवस एक करून रक्त आटवून तळ हातावरील फोडाप्रमाणे सांभाळत असतो. परंतु बर्‍याच वेळेस येणार्‍या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. तसेच बर्‍याच वेळेस सांभाळलेल्या पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांचा आर्थिक कणा मोडला गेलेला आहे. अशा या नैसर्गिक आपत्तीमुळे व मनमानी बाजारपेठ यामुळे शेतकरी हवालदिल असताना मुक्ताईनगर सह जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या उपद्वापामुळे शेतकर्‍यांनी स्वतःच्या लेकराप्रमाणे वाढवलेल्या पिकांचे बर्‍याच प्रमाणात नुकसान होत आहे व शासन निर्णयानुसार सदर पीडित शेतकर्‍याला एक महिन्याच्या आत नुकसान भरपाई मिळणे बंधनकारक आहे.

परंतु मुक्ताईनगर सह जिल्ह्यात बहुतांश पीडित शेतकर्‍यांना मागील एक वर्षांपासून नुकसानीची मदत मिळालेली नव्हती. सदर शेतकरी वन विभागाच्या फेर्‍या मारून वैतागलेले होते त्या अनुषंगाने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी वन विभागाच्या सुस्त कारभाराची तक्रार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. तसेच प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाआरती त्यानंतर चक्का जाम आंदोलन करून शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सुस्त कारभाराकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्या अनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्यांच्या नुकसानीचे पंचनाम्यानुसार धनादेश प्राप्त झालेले असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांचे कौतुक होत आहे.

Exit mobile version