Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : मुक्ताईनगर तालुक्यात बनावट दारूचा कारखाना उध्वस्त !

मुक्ताईनगर-पंकज कपले | तालुक्यातील रूईखेडा येथील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने उध्दवस्त करत लाखो रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात बनावट दारूचे रॅकेट असल्याची चर्चा अनेकदा होत असते. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क अर्थात स्टेट एक्साईजच्या खात्याने धडक कारवाई केली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील रूईखेडा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती स्टेट एक्साईजच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या अनुषंगाने पथक तयार करून काल मध्यरात्रीच्या सुमारास येथे छापा टाकण्यात आला.

या छाप्यात सदर ठिकाणी देशी आणि विदेशी दारू बनावट पध्दतीत तयार करण्यात येत असल्याचे दिसून आले. बनावट दारू तयार करून याला बॉटलमध्ये पॅक करून यावर विविध कंपन्यांचे लेबल लाऊन विकले जात असल्याचे दिसून आले. या कारवाईत बनावट दारू तयार करणारे रसायन आणि अन्य सामग्री असा लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याचे भुसावळ येथील निरिक्षक सुजीत कपाटे यांनी या लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना या कारवाईला दुजोरा दिला असून या संदर्भात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आम्ही आपल्याला या संदर्भात लवकरच अपडेट माहिती देत आहोत.

Exit mobile version