कत्तलीसाठी गायी घेऊन जाणार्‍यांना अटक : चौघांच्या आवळल्या मुसक्या

मुक्ताईनगर, पंकज कपले | तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ मध्यरात्रीनंतर एका ट्रकमधून निर्दयीपणे कत्तलीसाठी गायी घेऊन जाणार्‍यांचा डाव पोलिसांनी उधळून लावत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर तालुक्यातून अनेकदा परराज्यातून गुरांची वाहतूक करणारी वाहने जात असतात. पोलीस अनेकदा या प्रकारच्या धडक कारवाया करत असतात. अशीच एक कारवाई काल रात्री पाऊण वाजेच्या सुमारास तालुक्यातील पुरनाड फाटा येथे झाली आहे.

पुरनाड फाट्याजवळून एचआर ५५ डब्ल्यू-८५६१ या क्रमांकाच्या ट्रकमधून गायींची अतिशय निर्दयीपणे वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेले जात असतांनाची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पुरनाड फाट्याजवळ पोलिसांनी या ट्रकला अडविले असता याच्या चालकासह चौघे जण ट्रक टाकून पळण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. यात पोलिसांनी सुमारे २ लाख ४० हजार रूपयांच्या १२ जर्सी गायींची मुक्तता केली असून सुमारे पाच लक्ष रूपयांचा ट्रक जप्त केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी या ट्रकचा चालक साबीर इस्माईल (रा. बुरा का जिल्हा नुह राज्य हरियाणा) तसेच अब्दुल सत्तार अब्दुल गफार( ता मावना जिल्हा किठोर उत्तर प्रदेश); वसीम आस मोहम्मद (ता सयीदपूर मोदी नगर उत्तरप्रदेश); साहिल खान सपात खान (ता पोटला तह नूह उत्तर प्रदेश ) या चौघांच्या विरूध्द मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अंकुश बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सी सी टी एन एस नंबर २१०/२०२२; भादंवि ३४ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारित २००५ चे कलम ९, ११ (१); (ए); (एफ), (एच); (के); (आय) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ९ ११ आणि महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम८३/१७७प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस निरिक्षक शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखालील उप निरिक्षक शेवाळे, पोहकॉ जवरे, अंकुश बाविस्कर, धर्मेंद ठाकूर यांच्या पथकाने केली. या चौघांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Protected Content