दोन आमदार अन् एक खासदार. . .आता उघडा विकासाचे दार !

मुक्ताईनगर, पंकज कपले ( लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट ) | दोन आमदार आणि एक खासदार असण्याचा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला मिळाला नसेल असा भाग्याचा योग मुक्ताईनगर तालुका व मतदारसंघाला आता लाभला आहे. यामुळे आता नाथाभाऊ आणि चंदूभाऊंनी पाहिजे तिथे नक्की राजकीय कुस्ती खेळावी, पण मतदारसंघाचा गतीने विकास करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मुक्ताईनगर तालुका हा गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील मोठे राजकीय शक्तीस्थान म्हणून गणला जातो. आधी प्रतिभाताई पाटील यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या या मतदारसंघात नाथाभाऊंच्या रूपाने जिल्ह्याचे नेतृत्व आले. २०१४ साली त्यांच्या सुनबाई रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून तालुक्याला खासदारही मिळाले. २०१९ साली रोहिणीताई खडसे यांचा पराभव होऊन चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारल्याने एकनाथराव खडसे हे काही काळ पीछाडीवर गेल्यासारखे वाटले. मात्र आज विधानपरिषद निवडणुकीत मिळविलेल्या विजयामुळे आता ते पुन्हा एकदा राजकीय मैदानात खेळी खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांची आगामी वाटचाल नेमकी कशी असेल हे तर येणारा काळच ठरविणार आहे. मात्र त्यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर मतदारसंघाला दुसरा आमदार मिळाला आहे. अर्थात, दोन आमदार आणि एक खासदारांचा तालुका अशी मुक्ताईनगरची ख्याती होणार आहे. याचा जनतेला कसा लाभ होईल हा मात्र मोलाचा असा प्रश्‍न आहे.

जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत नक्कीच मुक्ताईनगरमधील पायाभूत सुविधांसह विकास झालेला आहे. मात्र प्रगतीची ही गती अजून वाढण्याची लोकांना अपेक्षा आहे. विशेष करून मतदारसंघात एमआयडीसीचा विकास झालेला नाही. यामुळे उद्योगातून रोजगार निर्मिती देखील होत नाही. सिंचनाच्या रखडलेल्या योजना, अन्न प्रक्रिया उद्योग, लोकल्याणकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी आदी प्रश्‍न देखील कायम आहेतच. आता एकनाथराव खडसे आमदार बनल्याने तालुक्याला नवीन लोकप्रतिनिधी मिळाले आहेत. योगायोगाची बाब म्हणजे विधानसभा, विधानपरिषद आणि लोकसभा या तिन्ही सभागृहांमधील लोकप्रतिनिधी हे मुक्ताईनगरचे रहिवासी आहेत. आता त्यांचा तालुक्याच्या विकासाला लाभ व्हावी हीच अपेक्षा. विशेष म्हणजे एकनाथराव खडसे आणि चंद्रकांत पाटील हे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असल्यामुळे ते नक्कीच एकमेकांचे हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न करतील. ते स्वाभाविक असल्याने ही बाब नक्कीच होईल. मात्र या राजकीय वैमनस्यात मुक्ताईनगरकर भरडता कामा नये. अर्थात, तिन्ही लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून तालुक्यात नवीन विकासाचे पर्व सुरू व्हावे हीच आता अपेक्षा.

Protected Content