Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईभक्तांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार

 

भुसावळ, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संत मुक्‍ताई अध्ययन केंद्र व संत साहित्य अध्यासन केंद्राला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाल्याने मुक्ताई भक्तांनी त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

संत साहित्यामुळे समाजाला संस्कारशील शिक्षण मिळत असते. हे शिक्षण तरूणपिढीला मिळावे तसेच खानदेशातील संतांचा वारसा सर्वांपर्यंत पोहोचावा या हेतूने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संत मुक्ताई अध्ययन केंद्र आणि संत साहित्य अभ्यास अध्यासन केंद्र स्थापन करण्यात यावे अशा प्रकारची मागणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे केली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याने दोन दिवसांपूर्वी विद्यापीठात पार पडलेल्या बैठकीत अभ्यास केंद्र निर्मितीला मंजुरी देण्याचे ठरविण्यात आले.

त्यानुसार बुधवारी घेण्यात येणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. संत मुक्ताई यांच्या चरित्र व साहित्याचा अभ्यास तसेच इतर संतांचे चरित्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार मुक्ताई भक्तांतर्फे करण्यात आला. यावेळी हभप रामराव महाराज यांनी संत मुक्ताई यांची प्रतिमा भेट देऊन तर हभप लक्ष्मण महाराज यांनी संत मुक्ताई यांचा गाथा भेट देऊन सत्कार केला. यावेळी हभप सुधाकर महाराज, हभप तुकाराम महाराज, दत्तूभाऊ पाटील, डॉ. जगदीश पाटील उपस्थित होते.

Exit mobile version